घोटी । जाकीरशेख Ghoti

घोटी - नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहे याचं अनुषंगाने मुंबई इराणीवाडी कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणारे साईभक्तांना आज पहाटे अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने अनेक मोठा अपघात झाला या धडकेत दोघे साईभक्त ठार झाले तर काही साईभक्तांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान टँकरचालक फरार झाला असून घोटी सिन्नर महामार्गावर घोटीपासून ३ किमी अंतरावर देवळे गावाजवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार या साईभक्ताची पालखी घोटी जवळ मुक्काम करून पहाटे शिर्डीकडे मार्गक्रमण झाले होते दरम्यान पालखी पुढे जात असताना मागून येणाऱ्या टँकर क्र एमएच ४६ / बीएफ ४५१४ या टँकरने पालखीतील साईभक्तांना जोराची धडक दिली.

ही घटना लक्षात येताच अनेक साईभक्तांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या तर अनेक भक्तांना टँकर धडक दिल्याने ते गंभीरवस्थेत रस्त्यात पडून होते. यात राजकुमार राजेंद्र पटेल नामक साईभक्त जागीच ठार झाला तर अशोक अच्छेलाल गुप्ता हे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मयत झाल्याचे वृत्त आहे.

अपघात समजताच मागून वाटचाल करणारे साईभक्त व महामार्गावरील वाहनचालकांनी धाव घेऊन जखमी भक्तांना घोटी ग्रामीण रुग्णलयात दाखल केले . त्यात अलोक गुप्ता, अनिकेत देसाई, आशिष कांजारीया हे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

घोटी पोलिसांनी गणेश लालजी सरोज रा मालाड यांच्या फिर्यादीवरून अपघात करून फरार झालेल्या अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस तपास करीत आहे.