लखमापूर । Lakhmapur (वार्ताहर)

आधुनिक युगात अनेक कलांना घरघर लागली आहे. त्यातच एक जिवंत कला म्हणजे तमाशा. तमाशा कलेला सध्या अनेक गोष्टींमुळे उतरती कळा आल्यामुळे अनेक नामवंत कलाकारांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे.

ग्रामीण भागातील यात्रेतील ज्याला आत्मा म्हटले जायचे ते तमाशा. परंतु काळाच्या ओघात या जिवंत कलेला एक प्रकारे घरघर लागल्याने रसिकांचे मनोरंजन करणारा हाडामासांचा कलाकार आता एक वेळच्या भाकरीसाठी वणवण फिरत आहेत.

सध्या इंटरनेटचा जमाना रसिकांच्या मनावर राज्य करत असल्यामुळे तासन्तास एका जागेवर बसून तमाशांची अदाकारी पाहायला नव्या पिढीला आवडत नाही. चोवीस तास मोबाईलमध्ये रममाण होणारा तरुणवर्ग मात्र जिवंत कलेला पाहाण्यासाठी ना पसंती दाखवत असल्यामुळे पारंपरिक कलेला उतरती कळा येऊ लागली आहे.

तमाशा कला ग्रामीण भागातील लोककलेचा आत्मा म्हणून ओळखला जात होता. परंतु दिवसेंदिवस विज्ञानाचा प्रभाव विकसित होत असल्याने कलेचा उगम होण्याऐवजी ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कला ही माणसाला जगण्याचा मार्ग दाखवते.

त्यामुळे कलाकार कलेला आपली लक्ष्मी मानतात. परंतु आता मात्र कला हेच जीवन हे ब्रीदवाक्य काळाच्या ओघात नामशेष होते की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील यात्रेला आनंदाचे स्वरूप आणणारा तमाशा मात्र दिवसेंदिवस लुप्त होत चालल्याने कलाकारांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यात्रा हंगाम सुरू झाल्यावर हे कलाकार आपल्या संसाराचा गाडा यशस्वी पणे चालवित होते. परंतु सध्या करोनामुळे प्रत्येक गावातील, शहरातील यात्रा उत्सव बंद केल्यामुळे तमाशाची रंगत कमी झाली आहे.