नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे या करोना स्पेशल ट्रेन आहे. नियमित रेल्वे अजून चालू करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. जेव्हा नियमित गाड्या चालू होतील त्यावेळेस नांदगावला थांबत असलेल्या रेल्वेगाड्या पूर्ववत थांबतील. नांदगावकरांच्या प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने दोन-तीन गाड्या थांबवण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करू, अशी ग्वाही खा. डॉ. भारती पवार यांनी आज येथे बोलताना दिली.

रेल्वेंना पुन्हा थांबा मिळावा, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर खा. डॉ. पवार यांनी नांदगावी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत नांदगावकरांवर अन्याय होणार नाही, यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे गेटजवळ तयार होत असलेल्या भुयारी मार्गाचे काम हे नियोजित आराखड्याप्रमाणे झालेले नसल्याने या कामाची चौकशी करणार का? असा प्रश्न केला असता खा. डॉ. पवार यांनी अगोदर काम पूर्ण होऊ द्या नंतर चौकशी करू असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. रेल्वे थांबाबाबत जनतेच्या भावना तीव्र असून आपण जनतेच्या प्रतिनिधी या नात्याने रेल्वे थांबे मिळवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करू, असे खा. डॉ. पवार यांनी सांगितले.

अंडरपासच्या कामात रेल्वेच्या इंजिनियरिंग विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्या संदर्भात खा. डॉ. पवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्याने पत्रकार परिषदेनंतर त्यांनी अंडरपासच्या कामाची जाऊन पाहणी केली यावेळी अंडरपास बोगद्यामध्ये अनेक ठिकाणाहून पाणी झिरपत असल्याचे व सर्वत्र पाणी साचलेले दिसून आल्याने संबंधित विभागाच्या अधिकार्यांना त्यांनी पाण्याच्या निचर्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

अंडरपास हा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यानंतर जर या ठिकाणी काही समस्या दिसल्या तर अधिकार्यांना याबाबत जाब विचारू, असे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.