नाशिक । Nashik

मुंबई उच्च न्यायालयातील गोदावरी प्रदुषणमुक्तीसंदर्भातील जनहित याचिकेतील काही आदेशानुसार राज्य शासन व महापालिकेकडुन केवळ रामकुंड परिसरात लक्ष केंद्रीत केले जात असुन पुढे टाकळी - तपोवनातील मलनिस्सारण केंद्रातून थेट नदीत प्रक्रिया विना सोडल्या जाणार्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हा गंभीर प्रकार गोदावरी नदी व नाशिककरांच्या जीवाशी खेळणारा असल्याने आता पर्यावरणप्रेमीं यांच्यानंतर आता शिवसेनेकडुन यासंदर्भात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक शहरातील पवित्र गोदावरी नदी प्रदुषणमुक्तीसाठी शहरातील जागृत पर्यायरण प्रेमींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर उपाय योजनाप्रमाणे काम संथ गतीने सुरु असुन प्रदुषण करणार्यावर अद्यापही कडक कारवाई केली जात नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करीत आहे.

महापालिकेकडुन अलिकडच्या काळात रामकुंड परिसरात नदीत मिसळणारे सांडपाणी बाजुने मलनिस्सारण केेंंद्रात नेण्याचे काम केले जात असतांनाच शहरातील सर्वात मोठ्या टाकळी व तपोवन मलनिस्सारण केंद्रातून योग्य प्रक्रिया न करताच गोदावरी नदीत दुषीत पाणी सर्रास सोडले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. मलनिस्सारण केंद्रात ठरविलेल्या बीओडीपर्यत सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच नदीत पाणी सोडण्याचे नियम असतांना याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असुन याकडे महापालिका व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

याच गंभीर प्रकारासंदर्भात नुकतेच शिवसेना मध्य नाशिक उपविभागांच्यावतीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. टाकळी व तपोवन एसटीपी मधुन बाहेर येणार पाणी पात्रात मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणावर फेस होत आहे. भल्या सकाळी सांडपाण्याचा प्रवाह जास्त असल्याने उडणार्या फेसामुळे आजूबाजूची शेतीही धोक्यात आल्याने शहरवासीयांच्या अरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सांडपाणी मिश्रित गोदावरीचे पाणी पुढे सायखेडा चांदोरीसह मराठवाड्याच्या दिशेने जात असल्याने संपूर्ण नदीच प्रदूषित होत आहे. संपूर्ण शहराचा मैला या दोन एसटीपी प्लांटमध्ये येत असून मैला, कचरा बाजूला करून प्रक्रिया न करता हे पाणी थेट गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. दरम्यान या सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे,

मात्र कोणत्याही प्रक्रिया विना हे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने महापालिका प्रशासन करते काय ? गोदावरी नदीसह नाशिककरांच्या जीवाशी खेळ होत असतांना विभागीय आयुक्त यांचेही दुर्लक्ष झालं की काय असा प्रश्न शिवसेनेचे संचिन धोंडगे, प्रशांत बडगुजर, अक्षय वाबळे यांच्यासह पदाधिकार्यांनी उपस्थित केला आहे.