गावांना स्वच्छतेतून समृध्दीकडे न्या : मित्तल

जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन
गावांना स्वच्छतेतून समृध्दीकडे न्या : मित्तल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शौचालयाचे ( Toilet )महत्त्व आरोग्यासाठी अनन्यसाधारण असून गावाच्या आरोग्यासाठी शौचालयांचा नियमित वापर महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक गावाने नियोजन करावे तसेच जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या सर्व वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करून गावांना स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल ( ZP CEO Aashima Mittal )यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आज जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रनसह विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. नाशिक तालुक्यातील जाखोरी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी गावातील सर्व शौचालयांचा वापर होणे तसेच गावातील सार्वजनिक शौचालयांची ग्रामंपचायतींच्या माध्यमातून नियमित स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने त्यांच्या परीने योगदान दिल्यास गावात मोठा बदल होऊ शकतो, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज जाखोरी येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच गावामध्ये स्वच्छता रन, पथनाट्य कार्यक्रम व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी गावातील लाभार्थ्यांना आरोग्य विभागाकडील गोल्डन कार्डचे वितरणही करण्यात आहे.

जाखोरी गावाच्या सरपंच मंगला जगळे यांनी स्वच्छता अभियानामुळे गाव स्वच्छ, सुंदर व सुशिक्षित झाले असून स्वच्छतेमुळे गावाचा कायापालट झाल्याचे सांगितले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राहुल धात्रक यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी सारिका बारी, उपसरपंच ज्योती पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश निकम, गटशिक्षणाधिकारी मिता चौधरी, कृषी अधिकारी विजय चौधरी, पशुधन विकास अधिकारी कविता पटोळे, विस्तार अधिकारी श्रीधर सानप, जे. डी. सोनवणे, ग्रामसेवक जगदीश कदम, ग्रामपंचाय सदस्य विश्वास कळमकर, जया चव्हाण, मधुकर पवार, प्रकाश पगारे, अर्पणा कळमकर, उज्ज्वला जगळे यांच्यासह जिल्हा व तालुका कक्षातील समन्वयक उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यात 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त (World Toilet Day)सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता रन तसेच श्रमदान मोहीम, पथनाट्य कार्यक्रम, स्वच्छता शपथ आदींचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनीही त्यांना नेमून देण्यात आलेल्या तालुक्यांतील गावात जाऊन शौचालय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जनजागृती केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेट चंद्राची, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी इगतपुरी तालुक्यात, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सिन्नर, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी दिंडोरी तालुक्यातील कार्यक्रमात सहभाग घेतला. यासह सर्व खातेप्रमुख 15 तालुक्यांतील कार्यक्रमात सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com