वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्या

वीज वितरणच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री भुसे यांचे निर्देश
 वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्या

मालेगाव । प्रतिनिधी

सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वीज ग्राहकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जावी तसेच ग्राहकांशी सौजन्याने वागा, रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर त्वरित स्थलांतरीत करा, उपकेंद्रांच्या प्रलंबित मागण्यांची तत्काळ पूर्तता व्हावी, असे स्पष्ट निर्देश देतानाच कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वीज वितरण कंपनीने केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने येथील शासकीय विश्रामगृहावर वीज वितरण कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत कृषिमंत्री भुसे यांनी सर्कल व डिव्हीजनच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.

अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, प्रांत डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, अधीक्षक अभियंता संजय खंडारे, आर. एस. सानप, कार्यकारी अभियंता जे. के. भामरे, आर. एम. पाटील, एम. आर. साळुंखे, आर. पी. शिवगण, पी. आर. मोरे, आर. एम. गोसावी, प्रशांत चक्रवर्ती, प्रकाश चंदन, प्रेमकुमार, सचिन पाटील, संजीव बरियार आदी उपस्थित होते.

भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित राहतो. तीव्र तापमानामुळे घरात थांबणे असह्य होते. वीजपुरवठ्यासंदर्भात तक्रारीसाठी फोन केल्यास कुणी उचलत नाही, अशा तक्रारी वीज ग्राहकांतर्फे मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याकडे कृषिमंत्री भुसे यांनी अधिकार्‍यांचे लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली.

तक्रारदारांसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याबरोबर तक्रारदारांचे गार्‍हाणे ऐकून घ्या, त्यांना सौजन्याची वागणूक द्या, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा, रस्त्यांच्या कामाला अडथळा ठरणारे रोहित्र स्थलांतरीत करण्यात यावे, सबस्टेशनची प्रलंबित मागणी तातडीने मार्गी लावावी, नवीन रोहित्रांच्या मागणीसह सन 2011 पासून प्रलंबित असलेले पेड पेंडिंग निकाली काढावेत, महावितरणाच्या अपघातात दगावलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईची प्रकरणे निकाली काढावीत, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत भुसे यांनी यावेळी ज्या रोहित्रावर अधिकचा लोड आहे त्या ठिकाणी प्राधान्याने क्षमता वाढवून देण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. सर्कल कार्यालय ते संगमेश्वरदरम्यान एरियल बंच केबल टाकण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, पायाभूत आराखडा, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषी धोरण 2020, पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे, उच्चदाब वितरण प्रणाली, सौभाग्य योजनांची माहिती जाणून घेतली. तर त्रस्त नागरिकांचे निवेदन व संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्तावित केलेल्या कामांची तत्काळ पूर्तता करण्याचे निर्देश भुसे यांनी अधिकार्‍यांना दिले.

केबलचे काम चोवीस तासांत कार्यान्वित होणार : कुमठेकर

सर्कल कार्यालय ते संगमेश्वर एरियल बंच केबलचे काम येत्या चोवीस तासांत कार्यान्वित करण्यात येईल. त्याचबरोबर 1 जूनपर्यंत भूमिगत लाईनचेही काम पूर्ण होईल, असे आश्वासन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी यावेळी दिले. तर महावितरणाच्या अपघातात बळी गेलेल्या पशुधनाची भरपाई व महावितरणच्या अपघातात मयत झालेले सेवक सुभाष गायकवाड यांच्या कुटुंबास दिलासा देण्यासाठी महावितरणामार्फत सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य अभियंता कुमठेकर यांनी यावेळी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com