करोनाबाबत आवश्यक उपाययोजना करा
नाशिक

करोनाबाबत आवश्यक उपाययोजना करा

जि. प. सीईओ यांचे बाजार समित्यांना निर्देश

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निर्देशानंतर सहकारी संस्थाच्या जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हयातील सर्व बाजार समित्यांना करोनाबाबत आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील मुख्य प्रवेशव्दारावर सेवकांची नेमणूक करुन थर्मामीटर व ऑक्सीमीटरव्दारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी याबाबत सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांना बाजार समित्यांमध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले होते.

त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हयातील सर्व बाजार समित्यांना लेखी सुचना दिल्या असून यामध्ये बाजार समितीमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची थर्मामीटर व ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करणे, तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करणे, बाजार समिती आवारात सर्दी, ताप, खोकला असणा-या व्यक्तींना प्रतिबंध करणे व अशी व्यक्ती आढळून आल्यास यंत्रणेला कळविणे, अनावश्यक व विनाकारण कोणत्याही व्यक्तीस प्रवेश न देणे.

यासाठी प्रवेशव्दारावरच गर्दीचे नियंत्रण करणे, लीलावाच्या वेळी ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करणे, शेतमालाच्या वाहनासोबत एकाच व्यक्तीस प्रवेश देणे, बाजार समिती आवाराव ठिकठिकाणी हात धुण्यासाठी साबण, पाणी, सॅनिटायझर्सची व्यवस्था करणे, बाजार समित्यांचे काम संपल्यानंतर दररोज सोडीयम हायपोक्लोराईची फवारणी करुन परिसर निर्जंतुक करणे अशा प्रकारच्या सुचना जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com