लम्पी रोखण्यासाठी उपाययोजना करा

पशुसंवर्धन आढावा बैठकीत आ. कांदे यांचे निर्देश
लम्पी रोखण्यासाठी उपाययोजना करा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शेतकर्‍यांचा दुग्धव्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधन लम्पी ( Limpy )संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित राहावे यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश आ. सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांनी येथे बोलताना दिले.

येथील तहसील कार्यालयात अतिवृष्टी, लम्पी संसर्गजन्य आजाराचा वेगाने होत असलेला फैलाव आदी विविध विषयांवर आ. सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

तालुक्यात लम्पी आजाराने अद्याप प्रवेश केलेला नाही हे निश्चितच दिलासादायक आहे. परंतु या आजाराचा इतरत्र संसर्ग वेगाने वाढत असल्याने वेळीच खबरदारी घेतल्यास आपण या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवू शकतो. त्यामुळे यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत आ. कांदे यांनी व्यक्त करत सदर संसर्ग रोगाचा तालुक्यात प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव पाठवावे, अशा सूचना आ. कांदे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल देवकर यांनी लम्पी रोखण्यासाठी गोठ्याची नियमित स्वच्छता, गोचिडीपासून पशूंचे संरक्षण, जनावरे असलेल्या ठिकाणी लिंबाच्या पाल्याचा धूर आदी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

जनावरांच्या दुधातून हा आजार माणसात प्रवेश करत नसल्याने नागरिकांनी विनाकारण याविषयी भीती बाळगण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. लम्पीबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शासनस्तरावर व्यापक मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती डॉ. देवकर यांनी दिली. आढावा बैठकीस तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, मुख्याधिकारी विवेक धांडे, कृषी अधिकारी जगदीश पाटील, ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com