चिंता करण्यापेक्षा काळजी घ्या

व्यायाम, ताजे अन्न सेवन आणि पुरेशी झोप महत्वाची : तज्ज्ञ
चिंता करण्यापेक्षा काळजी घ्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात विषाणूबाधितांची संख्या वाढत आहे. सध्याचे हवामान विचित्र आहे. उन्हाळा सुरु होईल असे वाटत असतानाच पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट दोन दिवस सुरु होता. त्यामुळे रात्री गारवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे.

अशात विषाणूचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालये आणि खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. खोकला, ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे/घसा दुखणे, अतिसार, नाक वाहणे, शिंका येणे अशी सामान्य लक्षणे रुग्णांमध्ये आढळत असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. ऋतुसंधीच्या काळात विषाणूजन्य आजारांचा त्रास वाढतो. दरवेळी विषाणूंचे वेगवेगळे अवतार येत असतात. यावेळी तसे आहे असेही त्यांनी सांगितले.घरच्या घरी कशी काळजी घ्यावी, कोणती दक्षता घ्यावी याविषयीही कानमंत्र दिले.

ऋतुनुसार आहार-विहारात बदल आवश्यक

आयुर्वेदानुसार हा वसंत ऋतूचा काळ. या काळात निसर्गत:च आपल्या शरीरातील कफदोषाचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे कफदोषामुळे होणारे विकारांमध्ये ही वाढ झालेली दिसून येते. ऋतूनुसार आणि आपला अग्नि म्हणजेच पचनशक्ती यानुसार आहारा-विहारात काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते .उन्हाळा असल्याने थंड पेय, फ्रीजमधील पाणी या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

दही, लस्सी, आईस्क्रीम असे कफकर पदार्थ टाळले पाहिजेत. या काळात पचनशक्ती थोडी मंद व कमी झालेली असते. म्हणून भूकेप्रमाणे आणि पचायला हलका असा आहार घ्यावा. आहारात सुंठ, दालचिनी, तुळस, हळद , जिरे, धने यांचा वापर करावा. गोड पदार्थ कमी करून कडू व तुरट चवीचे पदार्थ आहारात असावेत. उदाहरणार्थ हळद, कारलें, पडवळ, तोंडली, यांचा आहारात उपयोग करावा. मध व हळद यांचे चाटण करावे.

गरम पाणी व थोडे लंघन म्हणजे कमी आहार घेणे किंवा सूप, हर्बल टी घेणे हे देखील कफ विहारात उपयुक्त ठरते. सर्दी सारखे आजार टाळण्यासाठी नाकाच्या आतील बाजूला आतील त्वचेला साजूक तूप किंवा खोबरेल तेल दोन वेळा लावावे. दुपारची झोप या काळात टाळावी. या खेरीज आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य अशा औषध औषधांचा उपयोग करावा.

वैद्य सौ. अनघा यार्दी

ताजे अन्न सेवन करा

ताजे अन्न सेवन करा. प्रथिनयुक्त सकस आहार असावा. तुरट आणि आंबट चवीची फळे, जसे की आवळा, मोसंबी आणि संत्री यांचा समावेश आहारात असावा. वातावरण हळूहळू उष्ण होत जाईल. त्यामुळे हायड्रेशनवर लक्ष द्या म्हणजे पाणी भरपूर प्या.

लिंंबू, मीठ आणि पाणी प्यावे. साधारणत: एक ग्लास पाण्यात चिमुटभर मीठ आणि लिंबाच्या एका फोडीचा रस एकत्र करुन प्यावे. बाहेरचे पदार्थ खाऊच नयेत. थोडासा व्यायाम, ताजे अन्न सेवन आणि पुरेशी झोप यामुळे तुमची प्रतिकारक्षमता सुदृढ होईल. नव्या संसर्गाची लक्षणे मला वाटते सर्वांनाच माहित असतील. त्यापैकी कोणतीही लक्षणे जाणवायला लागली तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.

डॉ. वैभव पाटील

पुरेशी झोप घ्या, स्वत:हून औषधे घेणे टाळा

घरातील वातावरण स्वच्छ ठेवा. भीमसेनी कापूर आणि गुग्गुळयुक्त धुपाचा वापर करावा. जेणेकरुन घरातील हवा शुद्ध राहील. अचानक पावसाळी हवा आहे. त्यामुळे घरात कुठे पाणी साठून डास होणार नाहीत याची काळजी घ्या. आहार नियंत्रित, ताजा आणि सात्विक असावा. अजीर्ण व्हायला नको. बाहेरचे खाणे टाळावे.

पोट नियमितपणे साफ राहिल याकडे कटाक्ष असावा. खरे तर सामान्यत: देखील महिन्यातून एकदा एरंडेल तेल घ्यायला हरकत नाही. रात्री झोपताना कोमट पाण्यातून दोन छोटे चमचे तेल प्यायले तर पोट चांगले साफ होते. या सगळ्या गोष्टी मिळून प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. पुरेशी झोप घ्यावीच. ती येण्यासाठी काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात. या काळात लोक एकमेकांना घरगुती औषधे सहज सुचवतात.

तथापि सामान्यत: प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्यामुळे घरगुती औषधांचेही परिणाम मिळावेत यासाठी एकदा वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा. खरे तर एकूणच तुमची प्रकृती आणि आरोग्यदृष्ट्या सामान्यत: घ्यायची काळजी वैद्यांकडून एकदा समजावून घ्यावी.

वैद्य अश्विनी चाकूरकर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com