म्युकरमायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्यावी : पालकमंत्री भुजबळ

येवल्यात करोनाविषयक आढावा बैठक
म्युकरमायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्यावी : पालकमंत्री  भुजबळ

येवला । प्रतिनिधी

करोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्युकर मायकॉसिस या आजाराचे रुग्णदेखील अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. याकरता करोनाबाधित व करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकर मायकॉसिस या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आढावा बैठकीमध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला विश्रामगृह येथे करोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या बैठकीस पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, येवला तालुक्यात कान, नाक व घसातज्ज्ञ नसल्याने म्युकर मायकॉसिसचे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठवण्यात यावे.

या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व नियोजनपूर्वक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात म्युकर मायकॉसिसबाबत टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनवर जे रुग्ण आहेत अथवा ज्या रुग्णांनी ऑक्सिजनवर उपचार घेतले आहेत अशा रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू झाल्यानंतर ऑक्सिजन तुटवड्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

करोना रुग्णांची संख्या कमी होण्याकरता ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत असल्याने लॉकडाऊन नियामांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

याचाच भाग म्हणून शहरी भागातील रुग्णांची संख्या कमी होत असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. करोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृह विलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे.

त्याचप्रमाणे लासलगाव येथील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे. 45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहीम जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करण्यात यावे. नगरपालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

येवला शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनची केली पाहणी

करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरात प्रत्यक्ष पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी प्रथमतः शनी पटांगण येथील भाजीबाजार परिसर येथून पाहणीस सुरुवात करून येवला शहरातील विविध भागातून पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com