नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा

देवाज ग्रुपकडून पोलिसांना निवेदन
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

संक्रात सण (Sankrat Festival) काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात आतापासूनच पंतगप्रेमींकडून पंतग (Kite) उडवण्यात सुरुवात केली आहे. मात्र, पंतगप्रेमींकडून नायलॉन मांजाचा (Nylon Manja) सर्रास वापर होत असल्याने या मांजावर बंदी घालून अशा प्रकारचा मांजा विकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देवाज् गु्रपकडून पोलिस निरिक्षकांना निवेदन (memorandum) देत केली आहे.

नायलॉन मांजावर असलेली बंदी केवळ कागदावरच उरली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात पंतगप्रेमींकडून सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होत आहे. सांकेतिक शब्दांचा वापर करून नायलॉन मांजाची विक्री (Sale of nylon manja) होत असल्याचे सध्या शहरात चित्र आहे. अनेकजण प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी दुकानांऐवजी सार्वजनिक जागेत किंवा घरात रात्रीच्या वेळी नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत.

परिणामी मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाने ‘कमबॅक’ केल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. तर अजून मकर संक्रात दुर असतानाही आताच नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा होत असल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांत अनेकांना या मांजामुळे गंभीर ईजा झाल्याचे बघायला मिळाले. शहरातील काही भागांत कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे.

गल्ली-बोळात असलेला मांजाचा गुंता आणि लहानग्यांच्या हातात दिसणार्‍या मांजामुळे हा काळाबाजार समोर येत आहे. त्यामुळे नायलॉन मांजावर बंदी घालून या मांजाची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देवाज् ग्रुपचे अध्यक्ष योगेश लोंढे व पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रतन कुमावत, अमोल झगडे, राकेश कोकाटे, सुरज साठे, अजिंक्य नवसे, ओकांर कासार, विक्रांत कुलकर्णी, आशिष राणे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com