स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

कादवा साखर कारखाना गेटवर आज ऊस रोखणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विविध मागण्यांसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेतर्फे ( Swabhimani Shetkari Sanghatna ) गुरुवारी (दि.17) सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadwa Cooperative Sugar Factory)गेटवर ऊस रोखण्यात येणार आहे.स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी या आंदोलनास उपस्थित राहणार आहेत.

15 ऑक्टोबरला 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे झाली. यामध्ये एकरकमी एफआरपी अधिक 350 रुपये वाढीव भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागितला. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाच्या वजनात काटेमारी केली जात आहे. या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आवाज उठवला.

महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखान्यांचे काटे हे ऑनलाईन झाले पाहिजे. यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा निघाला. या मोर्चाचा धसका घेऊन साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला.परंतु एकरकमी एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकर्‍यांची एकजूट दाखवणे गरजेचे आहे. म्हणून 17 आणि 18 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

संघटनेच्या मागण्या

1) सन 2021-22 हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक 200 रुपये अंतिम भाव मिळावा व राज्य सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफप्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत.

2) राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेशमध्ये केलेली दुरुस्ती त्वरित मागे घेऊन येणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा दुरुस्ती करून एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या सरासरी उतार्‍याच्या आधारावर या हंगामामध्ये म्हणजेच सन 22-23 च्या हंगामामध्ये एकरकमी एफआरपी द्यावी.

3) ऊसतोडणी मजूर हे स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फतच मजूर पुरवावेत. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून अथवा कारखान्याकडून महामंडळाने वर्गणी वसूल करू नये.

4) केंद्र सरकारने 60 लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिलेली आहे. अजून तीस लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.

5) केंद्र सरकारने साखरेची किंमत 3500 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करून इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 5 रुपयांची वाढ करावी.

आंदोलनात असणार्‍या मागण्या केंद्र सरकार व काही मागण्या राज्य सरकार यांच्याशी संबंधित आहेत. आपण शेतकर्‍यांनी एकत्रित ताकद दाखवली तर निश्चितपणे या मागण्या मान्य होतील. म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी या ऊसतोड आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com