सिन्नर : नांदूरशिंगोटेत जावयाचा संशयास्पद मृत्यू

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलला रवाना
सिन्नर : नांदूरशिंगोटेत जावयाचा संशयास्पद मृत्यू

सिन्नर । प्रतिनिधी

तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील सासरी राहणाऱ्या जावयाचा गुरुवारी (दि.13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान सासूच्या घरातच संशयास्पद मृत्यू झाला असून अति मद्य सेवनामुळे त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा दावा मयताच्या पत्नी आणि सासूने केला आहे.

तर उल्हासनगरहून आलेल्या मयताच्या भाऊ व वडिलांनी सून आणि तिच्या आईने संगनमत करुन आपल्या मुलाला मारल्याचा संशय व्यक्त करीत आक्षेप घेतल्याने 24 तास उलटूनही मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. आज (दि.14) सायंकाळी उशिरा दोडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला.

उल्हासनगर येथील लखन परशुराम नन्नावरे (32) याची नांदूरशिंगोटे येथे सासुरवाडी असून आंबेडकरनगरजवळ सासूच्या घरातच तो गेल्या दोन-तीन महिण्यांपासून पत्नीसह राहत होता. परिसरातच रोजंदारीवर मिळणारे काम करत तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी (दि.13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान लखन याचा झोपेत असताना घरातच मृत्यू झाला असल्याची खबर नांदूरच्या पोलीस चौकीला मिळाली.

हवालदार प्रविण अढांगळे यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मयताच्या अंगावर मारहाणीचे वळ त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. लखन याने सकाळपासूनच जास्त दारु सेवन केली होती व त्यानंतर तो घरातच झोपला होता. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान त्याचे घरातच निधन झाल्याचे त्याच्या पत्नी व सासूचे म्हणणे होते. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह दोडीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला व लखनच्या उल्हासनगर येथील वडीलांना घटनेची माहिती दिली.

आज (दि.14) वडील दुसऱ्या मुलासह येथे पोहचले, तेव्हा मृतदेहावरील मारहाणीच्या खूणा पाहून सूनेने व तिच्या आईने आपल्या मुलाला मारल्याचा आरोप करत त्यांनी शवविच्छेदनाला नकार दिला. यानंतर दोन्ही कुटुंबातील कुणीही पोलिसांकडे तक्रारही द्यायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेत मृतदेह नाशिकला हलवल्याचे समजते.

दरम्यान, मयत लखन हा उल्हासनगरमधील राहणारा असला तरी तेथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरोधात चोऱ्या, हाणामाऱ्यांसह विविध कलमांखाली 32 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. घरात केवळ पत्नी व सासूच असताना त्यांच्या मारहाणीत लखनचा मृत्यू झाला की घरात अजून तिसरे कोणी होते त्यादृष्टीने पोलीस चौकशी करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com