
सिन्नर । प्रतिनिधी sinnar
तालुक्यातील गुळवंच येथील सचिन सुभाष सानप (40) Sachin Subhash Sanap या प्राथमिक शिक्षकाचा मृतदेह Primary teacher's body संशयास्पदरीत्या अकोले -राजूर Akole Rajur Road रस्त्यावरील एका डोंगरात सीताफळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुळवंच गावातीलच भगवान हरी कांगणे (37) या प्राथमिक शिक्षकाने येवला तालुक्यात रेल्वेखाली 10-12 दिवसांपूर्वी आत्महत्या केली असून कांगणे यांच्या दशक्रिया विधीसाठी चाललो असे घरी सांगून जाणार्या सानप यांचा मृतदेह अकोले तालुक्यात आढळल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.
गुळवंच गावातील भगवान कांगणे (37) हे येवला तालुक्यातील कुसुर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी 19 नोव्हेंबरला येवल्याजवळच रेल्वेखाली आत्महत्या केली होती. सानप हे मुसळगावमधील हाबेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असून आपल्या कुटुंबीयांसह ते सिन्नर शहरात राहतात. रविवारी (दि.28) सकाळी भगवान यांच्या दशक्रिया विधीला जातो असे सांगून ते आपल्या मोटर सायकलसह घरून निघाले होते. मात्र, ते परत घरी आले नव्हते. त्यांच्या मोबाईलवरून त्यांचा शोध घेतला असता, मोबाईलचे लोकेशन अकोले तालुक्यात दिसत होते. सोमवारी (दि.29) सानप यांची मोटरसायकल अकोले-राजूर रस्त्यावर अकोलेपासून 13 किमी अंतरावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती.
परिसरातील एका रहिवाशाला ही मोटरसायकल बेवारस अवस्थेत आढळून आली होती. हँडल लॉक असलेल्या मोटरसायकलच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतल्यानंतर स्वतः सानप हे दोन दिवसांपासून घरी आले नसल्याची माहिती उघड झाली होती. मात्र, सायंकाळी अंधार झाल्याने परिसरात तपास करणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. मंगळवारी (दि.30) पोलिसांनी मोटर सायकल उभी असलेल्या रस्त्यापासून आत तपासणी सुरू केली असता आतल्या डोंगरातील एका सीताफळाच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सानप यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
मृतदेहाच्या चेहर्यावर काही खरचटल्याच्या जखमा असून मृतदेहाचे गुडघे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा आहे. गुळवंचचे शिक्षक, राहायला सिन्नर शहरात, नोकरीला मुसळगावला असे असताना कुठलेही नातेवाईक नसलेल्या अकोले तालुक्यात जातात काय आणि संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळतो काय? या सर्वच बाबी चक्रावणार्या असून एकूणच या आत्महत्येबाबत संशय व्यक्त होत आहे. ही आत्महत्या की घातपात याबाबतही उलटसुलट चर्चा होत आहे. सध्या कोविडच्या संकटामुळे प्राथमिक शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांना दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाळेत थांबावे लागते. एकाच गावातील दोन्ही शिक्षक वेगवेगळ्या गावात प्राथमिक शिक्षक असले तरी 11 दिवसांच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.