
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कामांमध्ये भ्रष्टाचार (Corruption) केल्याप्रकरणी तीन ग्रामसेवकांवर (Gramsevak) निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नांदुरमध्यमेश्वर (ता.निफाड) येथील ग्रामविकास अधिकारी, सोनोशी (ता.इगतपुरी) येथील ग्रामसेवक व वासाळीचे ग्रामसेवक यांचा समावेश आहे...
ग्रामस्तरावरील कामांसाठी अंदाजपत्रक अत्यावश्यक असताना त्याशिवाय लाखो रुपये खर्च झाल्याचे गट विकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून हा प्रकार उघडकीस आला आहे. याबरोबरच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेताच टँकरसाठी लाखो रुपये खर्च केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.
14 व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे दिसून येते. त्याआधारे गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडे सुपुर्द केला.
त्याआधारे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी ही कारवाई केली. निलंबनादरम्यान या ग्रामसेवकांना नांदगाव पंचायत समितीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकांमध्येमध्ये नांदुरमध्यमेश्वर (ता.निफाड) येथील ग्रामविकास अधिकारी मोहन पांडुरंग जमदाडे, सोनोशी (ता.इगतपुरी) येथील ग्रामसेवक पोपट सुदाम बोडके व वासाळीचे ग्रामसेवक नीलेशसिंग गोविंदसिंग चव्हाण यांचा समावेश आहे.
निलंबनाची कारणे
पर्यटनाचे केंद्र असलेल्या नांदुरमध्यमेश्वर येथील ग्रामविकास अधिकारी जमदाडे यांना 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये अनियमितता केल्याचा फटका त्यांना बसला आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यांनी 31 लाख 86 हजार 774 रुपयांची कामे केली आहेत. यात अंदाजपत्रक व मूल्यांकनाशिवाय ही कामे केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांमध्येही अनियमतता झाल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. सोनाशी येथील अंगणवाडी बांधकामास कार्यारंभ आदेश देवूनही तब्बल 10 वर्षे हे काम अपूर्ण आहे. तसेच गोडेवाडी येथील अंगणवाडी केंद्रासाठी वितरीत 9 लाख रुपयांचा हिशोब त्यांनी सादर केलेला नाही.
रजिस्टर अपूर्ण ठेवणे आणि कर्तव्यस्थानी अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्यामुळे पोपट बोडके यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. गावात पाण्याच टँकर सुरु करण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असताना नीलेशसिंग चव्हाण यांनी विनापरवानगी एक लाख 41 हजार रुपये टँकरवर खर्च केला.
तसेच अंदाजपत्रकाशिवाय 21 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले. 18 लाख 68 हजार रुपयांचे नियमबाह्य खर्च केल्याचे दिसून येते. खर्चासाठी अंदाजपत्रक अत्यावश्यक असताना या ग्रामसेवकाने लाखो रुपयांची कामे केली.