तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई

तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकांबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून कामात कसूर केल्याप्रकरणी जिल्हयातील तीन ग्रामसेवकांवर ( Gramsevak ) निलंबनाची कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. कामकाजात अनियमता, कर्तव्यात कसूर करणे आदींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील वादग्रस्त ग्रामसेवकांसह इतर दोघांचा यात समावेश आहे.

ग्रामपंचायत विभागाने या तिन्ही ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील सुभाष अहिरे यांचा समावेश आहे. नांदुर शिंगोटे येथे स्वच्छ सर्वेक्षण अतंर्गत शौचालय अपात्र असलेल्या कुटुंबाच्या यादीमध्ये हयात लाभार्थींना मयत, दुबार, स्थलांतरीत दाखवून अनुदानास अपात्र ठेवल्याची तक्रार अहिरे यांच्या विरोधात होती.

या तक्रारींवरून गटविकास अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून अहवाल मागविण्यात आला. यात, अहिरे यांनी शासनाची व वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करून लाभार्थी यादीची खात्री न करता पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील भास्कर भिका गावित यांच्या चौकशी अहवालात 15 व्या वित्त आयोगाचा निधीतील 6 लाख 59 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील शशिकांता जावजी बेडसे यांच्यावर विविध दोषारोप करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींच्या विविध योजनांचे बँक खाते सही नमुने न बदलणे, सभेला गैरहजर राहणे, सभेचा अहवाल सादर न करणे, कोविड लसीकरण मोहिमेस गैरहजर राहणे दप्तर उपलब्ध करून न देणे आदी कारणांमुळे बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com