तेरा लाखाचे टायर्स चोरणारा गजाआड

सिन्नर पोलीसांनी ठाणे जिल्ह्यात जाऊन आवळल्या मुसक्या
Sinnar Police Station
Sinnar Police Station

सिन्नर | प्रतिनिधी

चेन्नईतून दिंडोरीसाठी टायर घेऊन निघालेला कंटेनर सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर 13 लाख 46 हजारांचे 149 टायर्स घेऊन फरार झालेल्या कंटेनर चालकाला 15 दिवसांत मुद्देमालासह ताब्यात घेण्यात सिन्नर पोलीसांना यश आले आहे.

चेन्नई येथून 4 जूलेै रोजी अपोलो कंपनीचे 749 टायर्स घेऊन कंटेनर क्र. एनएल 01 / एबी 5940 निघाला होता. मात्र, 8 तारखेपर्यंतही कंटेनर दिंडोरी येथे पोहोचला नाही. त्यामूळे कंटेनर मालकाने चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चालकाने कंटेनरची जीपीएस सिस्टिम बंद केली होती तर त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यानंतर 12 जूलै रोजी हा कंटेनर बेवारस अवस्थेत सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईबाबा ढाब्याजवळ आढळून आला होता.

कंटेनरच्या मागच्या दरवाज्याचे सील तोडून त्यातील 749 पैकी छोटे-मोठे 149 टायर्स गायब झाले होते. ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक भरत मराठे, नाशिक यांनी कंटेनर चालक संदिप दगडूबा मुंडे रा. वागदरवाडी ता. आंबेजोगाई जि. बीड याने 13 लाख 46 हजार 262 रुपयांच्या टायर्सचा अपहार केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

पोलीस अधिक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांना तपासासाठी मार्गदर्शन केले. पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे यांचे पथक बीड जिल्ह्यात तपासासाठी रवाना केले होते.

चालक दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नाही. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने चालक संदिप मुंडे याला ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथील जनतानगर झोपडपट्टीतून शिताफीने ताब्यात घेतले.

सदर चालकाने लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर येथे डिस्काऊंटमध्ये कमी किमतीत टायर्स विकण्यासाठी दिले असल्याचे सांगत या टायर्सची विक्री केल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी चोरी गेलेल्या 149 पैकी 141 टायर्स हस्तगत केले आहेत. पोलीसांच्या या कामागिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com