आरोग्यसेविकेचा संशयास्पद मृत्यू ; डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

आरोग्यसेविकेचा संशयास्पद मृत्यू ; डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

पुनदखोरे । वार्ताहर

कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असताना हुबेहूब बनावट चाचणी अहवालात छेडछाड करुन पॉझिटिव्ह असल्याचे भासवून शासनाच्या 50 लाख रुपये सानुग्रह अनुदानासह विमा(insurance policy) पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी आरोग्यसेविकेच्या मृत्यूची शंका मयत आरोग्यसेविकेच्या भावाने उपस्थित केली आहे. यास तिचा पती तुषार गुंजाळ जबाबदार असल्याची फिर्याद कळवण पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आहे.

मयत आरोग्यसेविकेचा पती डॉ. तुषार गुंजाळ याला ताब्यात घेतले असून कळवण न्यायालयाने 14 दिवसांची 5 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली असल्यामुळे जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान पतीने जामीनसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

बगडू येथील किशोर मधुकर आहेर यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये( kalwan police station) फिर्याद दाखल केली आहे. त्यात नमूद केले आहे की, माझी बहीण मयत सुरेखा मधुकर आहेर ही 2008 पासून प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. 12 डिसेंबर 2009 रोजी आराई येथील तुषार दगा गुंजाळ यांच्याशी तिचा विवाह झाला. दोन वर्षे संसार सुरळीत चालला. दोन अपत्य झाली. एकीकडे सुखाने संसार सुरू होता तर दुसरीकडे तुषार गुंजाळ यांचे भावजयीसमवेत प्रेमसंबंध जुळले होते. याची वाच्चता झाल्याने दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणे होत होती.

दुसर्‍या अपत्यासाठी बहिणीला सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली. दवाखान्यातून घरी सोडल्यानंतर कळवण येथील सुयोग अपार्टमेंटमध्ये डॉ. तुषार गुंजाळ हे बहीण सुरेखासह राहात होते. तिच्या देखभालीसाठी तिच्यासोबत माझी पत्नी शीतलसोबत राहात होती. दरम्यान काळात बहिणीला खोकला येत असल्यामुळे तिची खासगी लॅबमधून अँटिजेन चाचणी करण्यात येऊन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे पत्नी शीतल हिने सांगितले होते. त्यानंतर 20 एप्रिल रोजी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

21 एप्रिल रोजी चाचणी अहवाल आलेला असताना 23 एप्रिल रोजी तुषार गुंजाळ यांनी रात्री उशिराने कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले तर त्याच रात्री 8 वाजता बहीण सुरेखा हिने मी करोनायोद्धा आहे, मला काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस असे फोनवरुन बोलताना सांगितले असताना त्याच रात्री 2 वाजता सुयोग अपार्टमेंटमधील माझ्या ओळखीचे पाटील यांनी बहिणीची तब्येत खूप सिरीयस असल्यामुळे तुम्ही कळवणला निघून या, असे सांगितले. मी नाशिक येथून निघतो तोपर्यंत तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जाण्याची विनंती त्यांना केली.

मी नाशिकहून कळवणला येत असताना रस्त्यात पाटील यांची बहीण सुरेखा मयत झाल्याचा फोन आला. आराई येथे बहिणीवर अंत्यविधी करत्यावेळी तिचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यामुळे तिचे शवविच्छेदन कळवणला करण्यात आले नसल्याचे समजले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 9 मे रोजी तुषार गुंजाळ यांच्या मोठ्या भावाने फोन करून बहीण सुरेखा हिचे असे होणार असल्याचे मला माहीत होते, असे लहान भावाची पत्नी घरात सांगत असल्याचे सांगितले. यावरून तुषार गुंजाळ यांच्यावर संशय आला. घरात कुणी पॉझिटिव्ह नसताना बहिणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला म्हणून बहिणीच्या करोना पॉझिटिव्ह अहवालवरील बारकोड माझ्या मोबाईलमध्ये स्कॅन करून बघितल्यावर अहवाल निगेटिव्ह आला.

यावरून बहिणीचा चाचणी अहवाल बनावट असल्याची खात्री झाल्याने 15 मे रोजी कळवण पोलीस ठाण्याला चौकशी करण्यासाठी अर्ज दाखल देऊन बहीण सुरेखा हिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली. 20 एप्रिल ते 23 एप्रिलदरम्यान तुषार गुंजाळ यांनी बहीण सुरेखा हिची खासगी लॅबमधून चाचणी करून चाचणी अहवालावरुन बनावट अहवालात( false report) छेडछाड करून बहिणीच्या नावाने असलेल्या विमा पॉलिसीचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने बनावट व छेडछाड केलेला दस्तऐवज बनवल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. कळवण पोलिसांनी तुषार गुंजाळ यास ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com