सुरगाणा : श्रीभुवन व दुमी योजनेचे जलसंपदाकडून सर्वेक्षण

पाच हजार एकर ओलिताखाली येणार
सुरगाणा : श्रीभुवन व दुमी योजनेचे जलसंपदाकडून सर्वेक्षण

कळवण | Kalwan

सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करुन लाभक्षेत्रातील आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दुमी व श्रीभुवन प्रकल्पाचा प्रस्ताव शासनस्तरावर तात्काळ सादर करण्याच्या सुचना संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पस्थळावर दिल्या. त्यामुळे सुरगाणा तालुक्यात सिंचन योजना मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

नाशिक येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रास्तवित सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती.

जलसंपदामंत्री श्री पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे व यंत्रणेला आमदार नितीन पवारांसमवेत सुरगाणा तालुक्यातील दुमी व श्रीभुवन योजनाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची पहाणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत दिले होते.

सुरगाणा तालुक्यात एकही मोठी सिंचन योजना नसल्याने केवळ २ टक्के सिंचन होते. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. उन्हाळ्यात रोजगारासाठी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन ओलिताखाली आणणे हा एकमेव पर्याय आहे.

त्यामुळे श्रीभुवन लघुपाटबंधारे योजना व पार नदीवरील दुमी लघु पाटबंधारे प्रकल्पास शासनाने मान्यता द्यावी व निधी देऊन प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी बैठकीत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

दुमी प्रकल्प हा पार नदीवर असून साठवण क्षमता 1700 द.ल.घ.फु. आहे. त्या अंतर्गत दोन कालवे असून एक कालवा 34.13 कि.मी. व दुसरा 42.17 कि.मी. आहे . दोन्ही कालव्या अंतर्गत सुरगाणा , पेठ व दिंडोरी हया तालुक्यातील 35 गावांचे 5000 एकर क्षेत्र सिंचनाखालील येणार आहे.

त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा सविस्तर अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी कोकण महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे .

- आमदार नितीन पवार, कळवण सुरगाणा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com