औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांची पाहणी

औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांची पाहणी

सातपूर । प्रतिनिधी Satpur

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य अभियंता शिवहरी दराडे यांनी नाशिक, सिन्नर व दिंडोरी भागाचा दौरा करून येथील विविध प्रश्नांंची पाहणी केली.

परिसरातील उद्योजक संघटना पदाधिकार्‍यांची या प्रश्नांबाबत चर्चा करून तातडीने सोडवण्यासाठी विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सुरुवातील सिन्नर येथील रस्त्यांची पाहणी केली. सदर रस्ते दुरुस्ती येत्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले.

उद्योजकांशी झालेल्या चर्चेत अंबड औद्योगिक वसाहतीतील एच सेक्टर, नवीन झालेले एस सेक्टर व आयटी पार्कचे रस्ते अजूनपर्यंत नाशिक महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. सदर रस्ते डांबरीकरणाचा एक पदर टाकून मनपास हस्तांतरित करणे बाबत एमआयडीसी मुख्य कार्यालय मुंबई येथून प्रलंबित असलेली मंजुरी देऊन काम मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले.

तसेच सातपूर येथील 50 वर्ष जुनी भाडेतत्वावरील इमारतीबाबत जो अहवाल आला आहे त्या प्रमाणे सदर प्रकल्प हा पुनर्प्रस्थापित करण्याकरिता मुख्य अभियंता दराडे यांनी दोन ते तीन पर्याय सुचविले.

त्यात प्रामुख्याने सदर जागा सोसायटीला हस्तांतरित करून त्यावर आजच्या नियमाप्रमाणे विकसीत करून गाळेधारकांना आहे तेवढे बांधकाम द्यावे व आजच्या नियमाप्रमाणे भाडे आकार फ्री करावी अथवा लीजवर द्यावे. किंवा एमआयडीसी स्वतः सदर बांधकाम करून भूखंडाचे पैसे न घेता बांधकाम व इतर खर्च मिळून जो दर येईल त्यादराने 99 वर्षाच्या कराराने प्रकल्पधारकांना गाळे द्यावे.

तिसरा पर्याय म्हणून सोसायटीमार्फत विकासकास सदर जागा देऊन व त्याने सदर गाळेधारकांना जागा दिल्यानंतर उरलेली जागा विकून व सदर गाळेधारकांकडून कमीतकमी रक्कम अथवा भाडे घेऊन हा प्रकल्प राबवता येऊ शकेल असे मत व्यक्त केले.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणाबाबत लक्ष वेधले असता, दराडे यांनी कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांना महानगरपालिकेचे उपायुक्तांशी चर्चा करून संयुक्तपणे सातत्याने तीन महिन्याआड अशी मोहीम राबविल्यास संपूर्णपणे अतिक्रमण संपुष्टात येऊ शकते असे आदेश दिले.

नुकत्याच उदभवलेल्या प्लेटिंग उद्योगाचे सांडपाणी प्रकल्पाबाबत सखोल चर्चा झाली. त्यात उपस्थित उद्योजकांनी प्रकल्प हा स्वतः एमआयडीसीनेच बांधावा व देखभाल करावी व सदर काम लवकरात लवकर मार्गी लागावे असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com