जीपीएसद्वारे वनजमिनींंचे सर्वेक्षण

ब्रह्मगिरी पायथ्याचे उत्खनन प्रकरण
जीपीएसद्वारे वनजमिनींंचे सर्वेक्षण
USER

नाशिक । प्रतिनिधी

पश्चिम वनविभागाने ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुरू असलेल्या खासगी जागेतील उत्खननाच्या वादामुळे आता या भागातील वनजमिनीचे क्षेत्र आणि सीमांकनाचे जीपीएसद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.

नाशिक पश्चिम वनविभागाने उत्खननाची जागा वनजमीन आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी आता 91 वर्षे जुन्या सातबारा उतार्‍यांची छाननी सुरू केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश देत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी नवीन परदेशी, कोतवाल शंकर वाघेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

तसेच मंडल अधिकारी, तहसीलदारांनाही नोटिसा काढण्यात आल्या. तसेच सविस्तर अहवालही प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी मागितला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही या ठिकाणाहून सुमारे दोन हजार ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याची धक्कादायक बाब पाहणीत उघड झाली आहे. त्यामुळे खासगी विकासकाला 1 कोटी 52 लाख 40 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

वनजमिनीच्या संरक्षणासाठी वनविभागात सर्व्हेअर अर्थात वनक्षेत्रपाल दर्जाचा अधिकारी नियुक्त असतो. या अधिकार्‍यामार्फत वनजमिनीचे सीमांकन तसेच वनक्षेत्राची मोजणी केली जाते. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मौजे मेटघर व तळेगाव शिवारात झालेले उत्खनन वनजमिनीच्या हद्दीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आता सर्व्हेअरकडून सर्वेक्षण करून घेतले जाणार आहे.

दरम्यान, बेंचमार्कचा शोध घेणे, नैसर्गिक खुणांचे अस्तित्व तपासणे आणि वनजमिनीच्या हद्दीवर बुरुजांची उभारणी अशी कामे करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com