सुरगाणा | प्रतिनिधी

गुन्हे शाखा व सुरगाणा पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून घाटमाथ्यावरील युवकाच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. एक मार्च रोजी घाटमाथ्यावरील रोटी फाटा जवळ वांजुळपाडा येथील युवक राजेंद्र ढवळू बागुल याचा मृतदेह आढळून आला होता.

रोटी येथे वरातीत डीजेच्या तालावर फुगे घ्या फुगे... या गाण्यावर ठेका धरला असतांना किरकोळ धक्का लागल्याने नाचण्याच्या किरकोळ कारणावरून हत्येचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिस अधिक्षक सचिन पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण अमोल गायकवाड, ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पोलिस तपास सुरू असताना सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर उर्फ चम्या गंगाराम राऊळ (25) याचे नाव समोर आले. शोध सुरू असताना मधुकर उर्फ चम्या हा सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मिळून आला. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की २८ फेब्रुवारी रोजी तो व त्याचा दाजी हे दोघे रोटी येथे वरातीत नाचण्यासाठी गेले होते.

यावेळी वरातीत नाचण्यावरून आमचा राजू उर्फ राजेंद्र ढवळू बागुल रा.वांजुळपाडा याचेशी वाद झाला होता. म्हणून मी मोटरसायकलवर राजेंद्र यास बसवून गाळपाडा येथे दारू पिण्यासाठी बहाना करून घेऊन गेलो. गाळपाडा येथुन परत येताना हरणटेकडी शिवारात रोटी फाटा येथे त्यास दगडाने ठेचून करून नालीत पाडून त्याचे डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, एएसआय मुंढे, महाले, तुपलोंढे, खांडवी, चालक म्हसदे तसेच सुरगाणा येथील पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सहायक पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडखे, सागर नांद्रे, अनिल वाघ,गोतुरणे, गवळी आदींनी केलेल्या तपासात यश मिळाले असून याप्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मयत व संशयित हे डीजे वर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडीओ एकाच्या मोबाईल मध्ये पोलिस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसून आल्याने संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले.

विवाह समारंभ व इतर कार्यक्रमात स्मार्टफोन मध्ये अनेकजण व्हिडिओ चित्रीकरण करुन ते सोशल मीडिया,युट्यूबवर अपलोड करतात. याचाच धागा पकडून पोलिस यंत्रणा ख-या मारेकरी पर्यंत पोहचली आहे.तसेच पालकांनी आपली मुले रात्री अपरात्री कार्यक्रमाला जातांना नेमकी काय करतात.याकडे थोडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

दिवानसिंग वसावे.पोलिस निरीक्षक .