पुरवठा निरीक्षक निलंबित

गडगडसांंगवी रेशन धान्य घोटाळा प्रकरण
पुरवठा निरीक्षक निलंबित

घोटी । वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) बहुचर्चित गडगडसांगवी ( Gadgadsangvi ) रेशन धान्य घोटाळा प्रकरणी चुकीच्या पद्धतीने रेशन दुकानदारावर केलेल्या कारवाईमुळे अखेर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांंनी इगतपुरीचे पुरवठा निरीक्षक बी. एस. भावसार यांच्यावर आज शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाची कारवाई केली.

तीन आठवड्यांपूर्वी मौजे गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकान क्र. 111 येथील शासकीय रेशन धान्य दुकानदार बाळासाहेब मते खासगी वाहनामध्ये शासकीय धान्य विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी त्यास रंंगेहाथ पकडले होते. तेव्हा घटनास्थळी पुरवठा निरीक्षक भावसार यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत पंचनामादेखील केला होता. असे असताना दुकान क्र. 111 हे केवळ तहसीलदार यांनी रेशन दुकान नूतनीकरण झालेले नसल्यामुळे लहांगेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान क्र. 122 कडे प्रभारी म्हणून जोडण्याचा एक तोंडी आदेश दिलेला होता.

हाच धागा पकडून भावसार यांनी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याला बाळासाहेब मतेसह दुकान क्र. 122 च्या मालक अनिता लहांगे यांच्यावरही जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याविरोधात अनिता लहांगे व त्यांचे पती इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे यांनी आपल्यावर इगतपुरीचे पुरवठा निरीक्षक व वाडीवर्‍हे पोलिसांनी दाखल केलेल्या अन्यायकारक गुन्ह्याच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून नाशिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार सर्व परिस्थितीजन्य पुरावे, न्यायालयाने दिलेला निर्णय आदींची अंमलबजावणी करत जिल्हाधिकार्‍यांनी पुरवठा निरीक्षक भावसार यांच्यावर निलंबनाची कारवाईचे आदेश काढले.

दरम्यान, पुरवठा निरीक्षक भावसार हे गडगडसांगवी प्रकरण घडल्यापासून गायब आहेत. या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे सातत्याने भावसार यांना संपर्क साधत आहेत मात्र ते त्यांनाही प्रतिसाद देत नाहीत. विशेष म्हणजे या प्रकरणाबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याबाबत सतत दूरध्वनीवरून संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत.

गडगडसांगवी येथे पकडलेल्या रेशन धान्य दुकानाशी आमचा संबंध नसतानाही आमच्यावर पुरवठा निरीक्षक भावसार यांनी चुकीचा पंचनामा करून वाडीवर्‍हे पोलिसांच्या मदतीने दबावाखाली खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज जिल्हाधिकार्‍यांनी जी कारवाई केली ती योग्य आहे.

- गोपाळा लहांगे, माजी सभापती, इगतपुरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com