
सिन्नर । वार्ताहर Sinnar
स्मार्ट, स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या पंचसूत्रीवर आधारित असलेला आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायतीला मिळाला. वडांगळी, मुसळगाव व भोकणी या ग्रामपंचायती स्पर्धेत होत्या.
समितीने गावांची प्रत्यक्ष पाहणी करुन गुणांकनातून वडांगळीला प्रथम क्रमांक दिला. नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांच्या हस्ते सरपंच राहुल खुळे, उपसरपंच रवी माळी, सहाय्यक गट विकास अधिकारी चित्ते, विस्तार अधिकारी भुजाळ, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके यांच्याकडे पुरस्काराचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दायित्व विभागात ग्रामपंचायतने लोकसहभागातून कोविड काळात उभारण्यात आलेले कोविड सेंटर, गावातील काट्या काढणे व वृक्षारोपण, पाणी पुरवठ्याच्या विज बिलांचा नियमित केलेला भरणा, मागास वर्गीय अपंग व महिला बालकल्याण यांच्यावर नियमित खर्च, नियमित घेण्यात आलेल्या ग्रामसभा यांचा यावेळी विचार करण्यात आला.
स्वच्छता विभागात व्यक्तिगत शौचालयांचा होणारा नियमित वापर, सार्वजनिक इमारतींमधील शौचालयांंचा नियमित वापर व स्वच्छता, पाणी पुरवठा, भूमिगत गटारी, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, घंटागाडी व्यवस्थापन, रस्ते काँक्रीटीकरण, दशक्रीया विधीसाठी बैठक व्यवस्था, व्यायाम शाळा, बाजार ओटे, वाचनालय, शालेय उत्तम हजेरी पट, प्लास्टिक बंदीचा करण्यात आलेला ठराव, पंधरावा वित्त आयोगाचे योग्य नियोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव बौद्ध घटक वस्ती सुधारणा योजना, ठक्कर बाप्पा, जन सुविधा, प्रादेशिक पर्यटन विभाग यासारख्या योजनांमधून निधी आणून साधलेल्या विकासाची समितीने पाहणी केली. तसेच गावात विद्युत पथदिपांसाठी एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक चौकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले आहे, देवनदीवरील कोटा बंधार्यातून गाळ उपसा करण्यात आला आहे. ग्रामपंचायतचा दरमहा हिशोब हा ग्रामपंचायत फलकावर लावला जाता.दाखले हे ऑनलाईन स्वरूपात दिले जातात. फेसबुकवर ‘माझी वडांगळी, माझी जबाबदारी’ या पेजची निर्मिती केली गेली आहे
सांघिक कामगिरीचा विजय
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ, युवक, ग्रामपंचायत कार्यकारिणी, सेवकांनी गाव विकासासाठी उत्तम कामगिरी केल्याने हे बक्षीस मिळालेले आहे. पारदर्शकता, पायाभूत सुविधा, कोविड सेंटर, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण यात ग्रामस्थांचा व युवकांचा लोकसहभाग हे बक्षीस मिळविण्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे.
राहुल खुळे, सरपंच