उन्हाळ कांदा लागवडीला गती

मजुर टंचाईने शेतकरी हैराण
उन्हाळ कांदा लागवडीला गती

अंबासन । प्रशांत भामरे Ambasan-Malegaon

अतीवृष्टीपाठोपाठ (heavy rain) अवकाळीच्या संकटातून सावरत नामपूर (nampur) परिसरात सर्वत्र शेतकर्‍यांतर्फे उन्हाळी कांद्याची (Summer onions) लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. वातावरणातील बदलाव (Climate change) व विजेचा अनियमितपणा त्यातच मजुरांची टंचाई (Labor shortage) अशा तिहेरी संकटांचा सामना करत मिळेल तेथून मजूर आणत लागवडीचे कामे करून घेतली जात असल्याने शेतशिवार पुन्हा फुलले आहे.

यंदा कांदा लागवडीच्या मोसमातच अवकाळी पावसाने (Untimely rain) हजेरी लावल्याने उन्हाळ कांदा लागवड उशिराने सुरुवात होत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीची कामे खोळंबली होती.

बाजरी काढणे, शेतातील गवत साफ करणे व कांदा लागवड पुर्व मशागत करणे अशी कामे आधीच उशीर झाल्याने कशीबशी पुर्ण करत शेती कांदा लागवडीसाठी बळीराजाने तयार केली. मात्र कांदा लागवडीचा हंगाम व ऊस तोडणीचा सीजन बरोबरच असल्याकारणाने बर्‍याच प्रमाणात मजूर ऊसतोडणीसाठी बाहेरगावी निघून गेले आहेत. त्यामुळे उर्वरित मजुरावर कशीबशी लागवड करण्यास शेतकरी सुरुवात करीत आहे.

चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे बियाणे उशिराने टाकली असल्याने कांदा बियाणे तयार होण्यास उशीर झाला आहे. बियाणे कशीबशी तयार झाली असतांना मजुरांची मात्र मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत असल्याने शेतकरी मिळेल तेवढी माणसे लावून प्रसंगी घरचे सर्व लहानथोर एकत्र करून कांदा लागवडीसाठी शेतात उतरले आहेत. ज्या शेतकर्‍यांना गावात मजूर उपलब्ध होत नाही त्यांनी बाहेरगावाहून मिळेल त्या वाहनातून मजूर उपलब्ध करतांना दिसत आहेत.

मजुरांचा वाढता रोज तर वाहनांची भाडेवाढ सर्व बोजा सहन करून कांदा लागवडीवर शेतकर्‍यांनी भर दिला आहे. रिक्षा, टॅक्सी, टेम्पोवाले मजुरांच्या संपर्कात असल्याने ते शेतकर्‍यांना तोंडचा दाम घेऊन मजूर उपलब्ध करून देतात. त्यातच सध्या घडीला मजुरांची युनिटी झाल्याने दहा माणसे माझी एका माणसाचे जास्त पैसे देऊन इच्छा नसतांना मजुर उपलब्ध करून घेतले जात आहे.

अवकाळी पावसामुळे कोकणपट्ट्यातील मजूर अजून उपलब्ध झाले नाही. त्यांची भात शेती आवरणे पूर्ण झाले नसल्याने अद्याप नामपूर परिसरात आले नसल्याने जास्तच मजुरांची टंचाई भासत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पिंपळनेर, दहिवेल परिसरातील मजूर नामपूर परिसरात उपलब्ध होत होती ते मजूर मुक्कामी राहत असल्याने कामे चांगल्या प्रकारे होत होती. परंतु डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने त्यांची शेती कामे लांबली आहेत.

शेतकरी वाटेल ती मजुरी मोजून मजूर उपलब्ध करून घेत आहेत. मात्र आठवड्यातून तीन किंवा चार दिवसच वीजपुरवठा केला जातो तोही आठ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडत आहे. वीजेअभावी तीन किंवा चार दिवस कांद्याची लागवड करावी लागते. वीजेच्या संकटाबरोबरच वातावरणातील बदलामुळे कांद्याची रोपे खराब होतांना दिसत आहेत.

सध्या कांदा लागवडीची एकच धावपळ सुरू आहे. मजूर मिळत नसल्याने मिळेल तिथून मजूर उपलब्ध करावे लागते. वाढीव रोजंदारी देऊन सुद्धा मजूर मिळत नाही म्हणून बाहेरगावाहून वाढीव पैसे देऊन मजूर आणून कांदा लागवड पूर्ण करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

- शशिकांत कोर कांदा उत्पादक, अंबासन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com