'या' कारणामुळे उभा ऊस शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

'या' कारणामुळे उभा ऊस शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

निफाड। आनंद जाधव | Niphad

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेला साखर कारखान्याचा (Sugar factories) गाळप हंगाम आता मे महिना सुरू झाला तरी संपण्याचे नाव घेत नाही. तर गेल्या सात महिन्यापासून घरदार सोडून आलेल्या ऊसतोडणी (Sugarcane cutting) मजुरांना (laborers) आता गावाकडची ओढ लागल्याने अनेक मजूर गावाकडे परतू लागले आहेत. असे असतांनाही अद्याप तालुक्याच्या गोदाकाठ भागात तोडणीअभावी मोठ्या प्रमाणात ऊस (Cane) शिल्लक असल्याने आता हा ऊस कधी तुटणार असा प्रश्न शेतकर्‍यांना (farmers) सतावू लागला आहे.

तालुक्यात दरवर्षी कोपरगाव (kopargaon), कोळपेवाडी (kolpewadi), राहूरी (rahuri), कादवा (kadva), संगमनेर (sangamner), प्रवरा (pravara), द्वारकाधिश (dwarkadhish) आदी कारखान्याचे ऊसतोडणी मजूर मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. यावर्षी मात्र साखर कारखान्याच्या निवडणुका (election) असल्याने या कारखान्यांनी प्रथम आपआपल्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्याला प्राधान्य दिले. मात्र यावर्षी आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांच्या स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने (Late Ashokrao Bankar Patsanstha) भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेला रासाकाचा (RASAKA) गाळप हंगाम देखील सुरू झाला. साहजिकच प्रारंभी शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मात्र शेतकर्‍यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण रासाकाची गाळप क्षमता कमी असल्याने व शिवारात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने एका कारखान्यासाठी सर्व ऊस गाळप करणे अवघड होते. त्यातच बाहेरील कारखान्याचे कामगरार न आल्याने शेतकर्‍याच्या अडचणीत आणखी भर पडली. ऊस वेळेवर न तुटल्यामुळे अशा शेतकर्‍यांना कांदा (onion), गहू (Wheat), मका (Maize) आदी पीके करता आली नाही. त्यातच दिवाळीपूर्वी घरदार सोडून आलललेल्या मजुरांना आता 7 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर घराची ओढ लागली आहे. कारण पाऊस केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने या मजुरांना त्यांचे गावाकडची शेती खरिप हंगामासाठी (kharip season) तयार करावयाची आहे. त्यामुळे हे मजूर आता गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.

आधीच तालुक्यात मजूर टंचाईचे संकट (Labor shortage) असतांना आता ऊसतोडणी करणारे मजूर देखील गावाकडे निघाले असल्याने शेतातील उभा ऊस कसा आणि केव्हा तोडायचा याचे उत्तर शेतकर्‍यांना मिळत नाही. गोदाकाठ भागातील करंजगाव, सायखेडा, शिंगवे, म्हाळसाकोरे, तामसवाडी, शिवरे, दिंडोरी, कोठुरे, चापडगाव, भुसे, सारोळेथडी, करंजी, लालपाडी, चेहडी, वर्‍हेदारणा, चाटोरी, चांदोरी, सोनगाव आदी भागात 265 जातीचा ऊस अद्यापही मोठ्या प्रमाणात उभा आहे. या ऊसाचे वैशिष्ट्ये म्हणजे या ऊसाला वजन जास्त अन् साखर कमी निघते. विशेषत: डिसेंबर ते जानेवारी महिन्यात या ऊसाची लागवड केली जाते. कारखाना बंद पडण्याची वेळ आली असतांनाही या ऊसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याची धडकन वाढली आहे.

या ऊसाबरोबरच सर्वाधिक साखर देणार्‍या व वजनाने कमी असलेला 86032 जातीचा ऊस देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. शिवरे, भुसे, नांदूरमध्यमेश्वर, गाजरवाडी, तामसवाडी, गोंडेगाव, काथरगाव, जळगाव, कुरुडगाव, सोनगाव, निफााड, रसलपूर, सुंदरपूर, खानगाव थडी, दिंडोरी आदी शिवारात या ऊसाचे क्षेत्र मोठे आहे तर वजनासह साखर देखील जास्त असलेल्या व नव्याने दाखल झालेल्या 10001 जातीच्या ऊसाचे प्रमाण देखील गोदाकाठ भागात वाढू लागले आहे. मात्र या जातीच्या ऊसाचे बियाणे वेळेवर मिळत नसल्याने सध्या इतर ऊसाच्या प्रमाणात या ऊसाचे क्षेत्र कमी आहे. मात्र हा ऊस देखील तोडणीविना उभा आहे. तर रसवंतीसाठी चालणारा 419 जातीच्या ऊसाला सर्वाधिक मागणी आहे.

साधारण एप्रिल ते मे महिन्यात या ऊसाची लागवड केली जाते. साधारणपणे नाही कारखान्याला तर रसवंतीला उपयोगी पडेल असे गृहित धरून शेतकरी हा ऊस लावतो. मात्र रसवंतीची अपुरी संख्या अन् बाहेरील कारखान्यांनी फिरविलेली पाठ यामुळे गोदाकाठचे शेतकरी ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे चकरा मारू लागले आहेत. त्यातच यावर्षी हवामान विभागाने मे महिन्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज वर्तविल्याने पाऊस पडलाच तर शेतातून ऊस बाहेर कसा काढावयाचा हा प्रश्न शेतकर्‍यांना सतावू लागला आहे. नगदी आणि दोन पैसे हमखास मिळवून देणारे तसेच मजुरी खर्च कमी असल्याने शेतकरी ऊस पिकाला पसंती देत आला आहे. मात्र आता दीड वर्षाचा कालावधी लोटून देखील ऊस तुटत नसल्याने व आता उभ्या ऊसाचे नुकसान होवू लागल्याने ऊस पिकावर झालेला खर्च फिटणे अवघड बनल्याने उभा ऊस तुटावा यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com