साखर आयुक्तांनी केली रासाकाच्या सद्यपरिस्थितीची पाहणी

कारखान्याची मशिनरी, तयारीची घेतली माहिती
साखर आयुक्तांनी केली रासाकाच्या  सद्यपरिस्थितीची पाहणी

निफाड । प्रतिनिधी Niphad

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला रासाका आ. दिलीप बनकर यांच्या स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतल्याने राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड ( State Sugar Commissioner Shekhar Gaikwad ) यांनी पिंपळगाव बाजार समितीला भेट देत कामकाजाची पाहणी केली. तसेच यावेळी गायकवाड यांनी रासाका ( RASAKA ) कार्यस्थळावर जाऊन तेथील सद्यपरिस्थितीची पाहणी केली. येत्या गळीत हंगामात रासाका सुरू होणार असल्याने त्यासाठी लागणारी कामगार भरती, ऊस नोंदणी यासह रासाका मशिनरी व इतर कामकाजाची पाहणी साखर आयुक्त गायकवाड यांनी केली.

विधानसभा निवडणूक कालावधीत आ. दिलीप बनकर यांनी रासाका सुरू करण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. साहजिकच शासन दरबारी पाठपुरावा करत रासाका निविदा काढून तो भाडेतत्त्वावर घेण्यास आ. बनकरांना यश आले. सद्यस्थितीत रासाका परिसरातील जागेचे सपाटीकरण, मशिनरीची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, वीज, पाणी आदी सुविधा ही सर्व कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. कुठल्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत कारखाना सुरू करण्याचा मानस आ. बनकरांनी व्यक्त केला असून त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच साखर आयुक्त गायकवाड यांनी रासाका कार्यस्थळाला भेट देत पाहणी केली.

यावेळी त्यांनी कारखाना मशिनरी दुरुस्तीचा आढावा घेतला. राज्यात प्रथमच सहकारी संस्थेने साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतल्याचे हे एकमेव उदाहरण असून त्याबद्दल त्यांनी आ. बनकरांचे कौतुक केले. यावेळी साखर आयुक्तांनी स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेचीही पाहणी करून पतसंस्थेचा उत्कृष्ट कारभार व सर्वाधिक नफा यामुळे त्यांनी संचालक मंडळास धन्यवाद दिले. यावेळी आ. बनकर यांनी साखर आयुक्त गायकवाड यांचा सत्कार केला.

याप्रसंगी स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा. चेअरमन गफ्फार शेख, कार्यकारी संचालक अरविंद जाधव, बाळासाहेब बनकर, बाजार समितीचे संचालक सुरेश खोडे, चंद्रकांत राका, विलास नीळकंठ, उमेदमल जैन, अविनाश बनकर, रासाकाचे अवसायक राजेंद्र निकम, कार्यकारी संचालक सुनील दळवी आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, रासाका सेवक व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, रासाका सुरू होत असल्याने कारखाना परिसरातील व्यावसायिक व कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com