
नाशिक l प्रतिनिधी Nashik
केवळ 2 किलो वजन आणि हृदयाला छिद्र (A hole in the heart)असल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण अवघे 30 टक्के असलेल्या बाळावर येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ ललित लवणकर (Pediatric cardiologist Dr. Lalit Lavankar)यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया उत्तर महराष्ट्रात पहिल्यांदा करण्याचा मानही डॉ. लवणकर यांनी मिळवला.
सविस्तर माहिती अशी की, घोटी येथील एक दिवसाचे आणि 2 किलो 300 ग्रॅम वजनाने बाळ रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने अत्यावस्थ अवस्थेत डॉ. सचिन महाजन आणि डॉ. गिरीश सोनगिरे यांनी नाशिक येथील प्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ललित लवणकर यांच्या गुणवंत चाईल्ड हेल्थ केअर(Gunwant Child Health Care) येथे पुढील उपचारासाठी पाठवले.
डॉ. लवणकरांनी बाळाची तपासणी करून निदान केले असता त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 30 टक्के असल्याचे निदर्शनास आले. हृदयाच्या विविध तपासण्या अधिक सखोल आणि बारकाईने करून बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने निदान झाले.
वैद्यकीय परिभाषेत या आजाराला "टेटट्रोलॉजी ऑफ फॅलोट्स(fallots) व्युईथ पल्मोनरी अट्रेझिया(Atrasia)" हृदय आजार म्हटले जाते. त्यामध्ये रुग्णाच्या हृदयाला मोठं छिद्र असणे आणि हृदयाकडून फुफुसा(lungs)कडे जाणारी झडप पूर्णतः बंद असणे. या आजारामुळे बाळाच्या ह्रदयाकडून फुस्फुकडे रक्तप्रवाह अभिसरण न झाल्यामुळे सर्व त्रास सुरू होता आणि यावर योग्य उपचार न झाल्यास बाळाच्या जीविताला धोका संभवणार होता.
डॉ. लवणकर यांनी बाळाला तत्काळ येथील पायोनियर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेत पहिल्या चार दिवसात प्रथमतः त्याची तब्येत स्थिर केली आणि नंतर बाळाच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, डॉ. लवणकर यांनी शस्त्रक्रियेसाठी एक अत्यंत आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये त्यांनी बाळाच्या एक अतिरिक्त रक्तवाहिनीचा खुबीने वापर करून घेतला; जी बाळाचा जन्म होण्यापूर्वी आईच्या पोटात सुरू असते. ही वहिनी सगळ्या शरीरातून फुस्फुसाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांशी कनेक्टेड (जोडलेली) असते आणि बाळ जन्म घेताच ती 24 तासांनंतर आपोआप बंद होते. या रक्तवाहिनीचा वापर करून तीत स्टेंट टाकून तिला उघडी ठेवत बाळाला जीवदान देण्यात डॉ. लवणकर आणि त्यांचा चमू यशस्वी झाला.
या क्लिष्ट हृदय शस्त्रक्रियेत बाळाच्या या अतिरिक्त रक्तवाहिनीत स्टेंट टाकण्यात आला त्यामुळे असे झाले की, ही अतिरिक्त रक्तवाहिनी उघडीच राहिली. आता पुढे 8 ते 9 महिन्यानंतर बाळ जरा मोठे होताच 'ओपन हार्ट सर्जरी' करणे शक्य होणार असून बाळाच्या जन्मतः हृदयात असलेले छिद्र बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्त वाहिनीचा रस्ता पुन्हा शस्त्रक्रियेनंतर नव्याने तयार केला जाणार आहे.
यासर्व उपचार प्रक्रियेत डॉ. लवणकर यांच्या मार्गदर्शनात हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. निलेश पूरकर, भूलतज्ज्ञ डॉ. देव, बालरोग तज्ज्ञ डॉ. पुष्पक पलोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सहकार्य केले. शिशूच्या मानेतील रक्तवाहिनी उघडी करून दाखवण्याचे काम डॉ. निलेश पूरकर यांनी लिलया यशस्वी करुन दाखवले ज्यामुळे डॉ. लवणकर यांना स्टेंट टाकणे सोपे झाले.पायोनियर हॉस्पिटलच्या कॅथलॅबचे ललित झोपे , सुश्मिता पवार, विजय कांगने यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कॅथलॅबच्या टीमचे सहकार्य लाभले.
लहान बाळांच्या हृदय आजारावर अशा प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया व उपचार प्रणाली महाराष्ट्रात केवळ मुंबईत काहीच ठिकाणी उपलब्ध असून ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया ठरली .
वयाच्या 10 व्या दिवशीच बाळाला रुग्णालयातून सुखरूप घरी पाठवण्यात आले असून आता बाळाची तब्येत सुधारत आहे. बाळाला जीवनदान देण्याचे कार्य करणाऱ्या डॉ. ललित लवाणकर आणि संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.