गांधीनगरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

गांधीनगरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवत्रोत्सवाची ( Navratri Festival )जय्यत तयारी गांधीनगरमध्ये अंतिम टप्प्यात असून विविध मित्रमंडळांच्या बैठकांनी जोर धरला असल्याचे दिसून येत आहे. रामलीला मैदानावर रामलीला हिंदी नाटिका सादर करण्यासाठी कलावंत, संगीतकार, नेपथ्य, दिग्दर्शक मंडळी परिश्रम घेत असल्याचे दिसत आहे.

भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगर प्रेस परिसरात नवत्रोत्सवाचा उत्साह वाखण्याजोगा असतो. तीन महिन्यांपासून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात होते. नाशिकरोड पंचक्रोशीतील गांधीनगर येथील नवरात्रोत्सव दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. विविध कामांची आखणी, मंडप सजावटीवर अखेरचा हात, गरबा, दांडिया, विविध स्पर्धा, बक्षीस वितरण अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याने देवीभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. येथील नवरात्रोत्सव शहरातील तमाम देवीभक्तांसाठी पर्वणीच ठरतो.

गांधीनगर प्रेसमध्ये कर्मचार्‍यांची संख्या कमी जरी असली तरी नवरात्रोत्सव साजरा करण्याचा संकल्प, दृढ इच्छशक्ती, उत्साह तुसभरही कमी झालेला नाही हे विशेष. यावर्षी दुप्पट उत्साहात नवत्रोत्सव साजरा केला जाणार असल्याचे मित्रमंडळांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. यावर्षी गांधीनगर नवरात्रोत्सवचा लौकिक निश्चितच स्वागतार्ह ठरणार, असे चित्र आहे.

सर्बोजनीन दुर्गापूजा कमिटी, भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगर वेल्फेअर असोसिएशनअंतर्गत रामलीला सेवा समिती, गांधीनगर एफ टाईप नवरात्रोत्सव मित्रमंडळ, नवरंग मित्रमंडळ, सार्वजनिक मित्रमंडळ व इतरही लहान-मोठ्या मित्रमंडळांतर्फे उभारले जाणारे मंडप, देवीमूर्ती सजावट, दांडिया रास मंडप आदींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. गांधीनगर प्रेसच्या वेल्फेअर क्लब हॉल स्टेजवर सादर होणारी रामलीला नाशिक शहराचे प्रमुख आकर्षण ठरते. रामलीला सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य अहोरात्र कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेत असून नवरात्रोत्सवासंदर्भात विविध कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com