पिंपळवृक्षाची कत्तल रोखण्यात यश

पिंपळवृक्षाची कत्तल रोखण्यात यश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही हेरिटेज वृक्षांना आपला जीव गमवावा लागतो. शहर, परिसरात असे प्रकार वारंवार घडतात. हॅशटॅग चिपको चळवळ त्याबाबत कायम सतर्क असते. पंचवटीतील मालेगाव स्टँडजवळ विशाल पिंपळ वृक्षाची होणारी कत्तल रोखण्यात चळवळीच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले.

पंचवटीतील मालेगाव स्टँड या अत्यंत रहदारीच्या व सतत वर्दळ असणार्‍या भागात विशाल पिंपळवृक्ष तोडण्याचा प्रकार सुरू होताच स्थानिक नागरिकांनी विरोध केला. ही बाब त्यांनी हॅशटॅग चिपको चळवळीचे प्रणेते रोहन देशपांडे यांना दूरध्वनीवरुन कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती जाणून घेत संबंधित महापालिका अधिकारी व आयुक्तांकडे गार्‍हाणे मांडले. त्यांनीही त्वरित प्रतिसाद देऊन दखल घेतली. त्यामुळेच होणारा प्रकार थांबला.

महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नागरिकांचे सातत्याने अर्ज दाखल होत असतात. धोकादायक वृक्षांची उंची व विस्तार कमी करण्याबाबत परवानगी मागितली जाते. पंचवटी विभागाकडे दि.6 सप्टेंबर रोजी एकूण 17 अर्ज येऊन त्यांची शहानिशा करण्यात आली होती अशी माहिती उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे यांनी दिली. त्यानुसार मालेगाव स्टँडजवळच्या पिंपळ वृक्षाचा विस्तार कमी करण्यासाठी अर्ज आलेला होता. वृक्षस्थिती बघून अभिप्राय देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र वृक्षाची कत्तल होण्याचा धोका होता. तो प्रसंगावधानामुळे टळला व कत्तल रोखण्यात यश आले.

यासंदर्भात मनसेनेतर्फे उद्यान विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यात पर्यावरण मंत्र्यांनी निर्देश दिलेल्या

‘माझी वसुंधरा’ संकल्पनेकडे पूर्णपणे डोळेझाक होत आहे. सर्रासपणे हेरिटेज वृक्षांची कत्तल केली जात आहे. याकडे लक्ष वेधण्यात येईल. आपल्या विभागातर्फे वृक्षसंवर्धनाबाबत आगामी काळासाठी कोणती आखणी करण्यात आली आहे याविषयी खुलासा करण्याचीही मागणी करण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय अध्यक्ष विक्रम कदम, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जावेद शेख यांनी दिली.सदर निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक आयुक्त कैलास जाधव यांना ही सुपूर्द केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com