जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यशस्वी: रशीद

चार दशकांच्या कारकीर्दीचा सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांतर्फे गौरव
जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यशस्वी: रशीद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

सर्वधर्मिय जनतेने दिलेल्या निस्सीम प्रेमामुळेच आपली चार दशकांची सामाजिक (social) व राजकीय (political) कारकीर्द यशस्वी होऊ शकली आहे. जाती, पक्षभेद न करता आपण शहरातील विकासकामे करत गोरगरिबांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केले.

राजकारणापेक्षा समाजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच दंगलीसाठी (riot) प्रसिद्ध असलेल्या मालेगाव (malegaon) शहराचा कलंक पुसला जाऊन आज हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) बांधव गुण्यागोविंदाने येथे नांदत आहेत. जनतेचे प्रेम व सहकार्याच्या जोरावर या शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही शहराचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शेख रशीद (Senior leader former MLA Sheikh Rashid) यांनी येथे बोलताना दिली.

समाजकारणासह राजकारणात 40 वर्षे शहरवासियांची अखंड सेवा करत असलेल्या माजी आमदार शेख रशीद शेख शफी यांचा आज येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांतर्फे अग्रसेन भवनात नागरी सत्कार करण्यात येऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली. यावेळी सत्कारास उत्तर देताना शेख रशीद बोलत होते. मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले (MAMCO Bank Chairman Rajendra Bhosale) अध्यक्षस्थानी होते.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, बारा बलुतेदार मंडळ संस्थापक बंडुकाका बच्छाव,भाजप गटनेते सुनील गायकवाड, रिपाइं जिल्हाध्यक्ष भारत जगताप, शिवसेनेचे राजाराम जाधव, श्रीरामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पवार, नरेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, दिनेश ठाकरे, भारत म्हसदे, कमलाकर पवार, अजय मंडावेवाला, मधुकर देवरे, एजाज उमर आदी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

रंगीन साडीबरोबर कामगारांचे शहर म्हणून मालेगावची ओळख आहे. कष्टकरी कामगारांचे प्राबल्य असल्याने त्यांचे जीवनमान उंचावे या दृष्टिकोनातूनच आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवत झोपडपट्टी (slum) निर्मूलनासाठी केंद्रातील काँग्रेस (congress) सरकारकडे पाठपुरावा करत म्हाळदे व सायने शिवारात घरकुल योजना साकारण्यास भाग पाडले.

या योजनेमुळे गोरगरिबांना हक्काची घरे मिळू शकल्याचे सांगत शेख रशीद म्हणाले, आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात गिरणा धरणातून (Girna Dam) मालेगावसाठी (malegaon) पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) कार्यान्वित केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Former Chief Minister Vilasrao Deshmukh) व युती शासनकाळात आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळेच मालेगावचा पाणीप्रश्न संपुष्टात येऊ शकला. सामान्य रुग्णालय, गिरणा-मोसम नदीवर पूल, तळवाडे वाढीव पाणीपुरवठा योजना, उर्दू घर, सामाजिक सभागृहे, भूमिगत गटार योजना आदी विविध विकासकामे शहरासाठी साकारता आल्याचे समाधान आपणास आहे.

दंगलीमुळे बदनाम झालेल्या शहराचा कलंक पुसण्याचा विडा आपण उचलला या प्रयत्नांना हिंदू-मुस्लीम जनतेने समर्थपणे साथ दिल्याने शहरात अनेक अप्रिय घटना घडूनदेखील शांतता बाधित होऊ शकली नाही. गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या हिताचा विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच आपण राजकीय वाटचाल केली. जाती, पक्षभेद कधी मानला नाही. त्यामुळे शहरातील सर्वधर्मिय जनतेचे प्रेम आपल्याला मिळू शकले हे आपले भाग्य आहे.

सर्वपक्षीय-धर्मिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या या गौरवाने आपण भारावून गेलो आहोत. हा सत्कार भविष्यात अधिक कामे करण्याचे बळ देणारा ठरेल, असे शेख रशीद यांनी सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना गोरगरीब जनतेच्या समस्या व दु:ख जवळून बघणार्‍या व अनुभवणार्‍या शेख रशीद यांनी या उपेक्षित समाजासाठी आपण काही केले पाहिजे या दृष्टिकोनातूनच राजकारणात प्रवेश केला.

समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत त्यांनी नगरसेवक ते राज्यमंत्री असा तब्बल 40 वर्षांचा प्रवास आज पूर्ण केला. या प्रवासात त्यांनी शहरात केलेली विकासकामे व गोरगरिबांच्या उत्थानासाठी केलेले भगीरथ प्रयत्न निश्चितपणे अनुकरणीय असे ठरले असल्याचे गौरवोद्गार मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, बंडुकाका बच्छाव, सुनील गायकवाड, दीपक निकम, श्रीरामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, भारत चव्हाण, विनोद शेलार आदी सर्वपक्षीय नेत्यांची शेख रशीद यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. प्रास्ताविक युवक राष्ट्रवादी प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांनी केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांतर्फे शेख रशीद यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास रवींद्र पवार, गुलाब पगारे, रिपाइं जिल्हाध्यक्ष भारत जगताप, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, समता परिषद तालुकाध्यक्ष धर्मा भामरे, नरेंद्र सोनवणे, विवेक वारूळे, भारत म्हसदे, चिंतामण पगारे, नारायण शिंदे, राजाराम जाधव, अजय मंडावेवाला, जितेंद्र देसले, विठ्ठल बर्वे, महावीर छाजेड, अमित संघवी, समीर जोशी, कैलास शर्मा, राजेश अलिझाड, सोमन्ना गवळी आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com