
नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनाच्या सावटामुळे मागील दोन वर्षाच्या अंतराळानंतर या वर्षी पुन्हा एकदा राजीव गांधी भवन प्रांगणात गुलाब फुलांसह विविध फुलांचा दरवळ घुमणार आहे. गुलाब फुलांचे विविध प्रकार, झेंडू, फ्लॉक अॅस्टर, जरवेरा, शेवंती, निशिगंधा आदींसह विविध हंगामी फुले, पुष्परचना, मिनी एचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला यांच्या माध्यमातून मनपा मुख्यालयात दि.24 ते दि.26 मार्च दरम्यान तीन दिवसांचे ‘पुष्पोत्सव 2023’ प्रदर्शन भरणार असून,या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असल्याचे उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.
हे पुष्पप्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने मोसमी व हंगामी फुलांची मांडणी करण्यात येणार आहे. या सोबतच कुंडीतील वनस्पती, बोन्झाय, लटकणार्या कुंडीतील रोपे, सावलीत वाढणारी झाडे, आधार घेऊन पसरणारे वेल यांची मांडणी करण्यात येणार आहे.
या सोबतच विविध फुलांची सजावट, पुष्प रांगोळी, शुष्ककाष्ट, पानांची रचना, फळे, भाजीपाला सजावट, परिसर प्रतिकृती,तबक उद्यान, कुंड्यांची आकर्षक सजावट दर्शवणारे विविध स्टॉल्स उभारले जाणार आहे. या पुष्पोत्सवात 10 ते 12 पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने सर्वोत्तम गुलाब, सर्वोत्तम गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार, गुलाब राजकुमारी, सर्वोत्तम फुलराणी, जपानी पुष्परचना, सर्वोत्तम तबक उद्यान, सर्वोत्तम परिसर प्रतिकृती, सर्वोत्तम बोन्साय आदी पुरस्कार दिले जाणार आहेत.
सेल्फी पॉईंट, नृत्य, गायन, नाटिका आदी विविध सांस्कृतिक कार्यकमांची रेलचेल राहणार आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नाशिककरांनी भेट देऊन या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.