नाशिक | Nashik

कृषि उत्पादनात देशात नाशिक अग्रेसर असून येथील शेतमालाला देशभरातील बाजारपेठ सहज पोहचविता यावे, यासाठी देशातील पहिली ‘कृषि रेल्वे’ सुरु करण्यात येत आहे. या रेल्वेगाडीमुळे नाशिकसह परिसरातील कृषि उत्पादनांना अवघ्या काही तासात कुठल्याही बाजारपेठेत पोहचविणे सहज शक्य झाले आहे.

द्राक्ष उत्पादनात नाशिक देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र कृषी रेल्वेतून वाहतुकीसाठी द्राक्ष, ॲपलबोर तसेच काही भाजीपाल्याला पन्नास टक्के सबसिडीतून वगळण्यात आलेले असून या पिकांचा रेल्वे वाहतुकीच्या पन्नास टक्के सबसिडीमध्ये तातडीने समावेश करावा, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषी तथा अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

केंद्र शासनाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी देवळाली रेल्वे स्थानकातून देवळाली ते दानापूर या विशेष कृषि रेल्वे सुरु करण्यात आली आहे. भारतात प्रथमच हा कृषि रेल्वेचा प्रयोग करण्यात आला आहे. देशभरातील पहिल्यीच कृषि रेल्वे नाशिक येथून सुरु करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कांदा, द्राक्ष उत्पादनासह भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे येथील शेतमालाला राज्यासह राज्यबाहेर विक्रीसाठी पोहचविण्यसाठी ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

रेल्वेकडून शेतमाल वाहतुकीला विशेष पन्नास टक्के सबसिडी (भाड्यात सवलत) दिली जाते. मात्र यात द्राक्ष, ॲपल बोर, तसेच काही भाजीपाला आदी पिकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबना होत आहे.

त्यामुळे द्राक्ष, ॲपलबोर यासह समाविष्ट नसलेल्या अन्य भाजीपाला वाहतुकीला रेल्वेकडून पन्नास टक्के सबसिडी मिळावी, याबाबतची गळ शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने खासदार गोडसे यांना घातली होती. शेतकऱ्यांची मागणीची गंभीर दखल घेत खा. गोडसे यांनी तात्काळ आज कृषीमंत्री तोमर यांची दिल्लीत खास भेट घेत शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या.

खा. गोडसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या न्यायिक असल्याचे लक्षात येताच कृषीमंत्री तोमर यांनी याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री तोमर यांनी खा. गोडसे यांना दिले.

कांदा विषयीचे धोरण निश्चित करतांना शेतकरी हित जोपासा

केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्याप्रमाणात कांदा दर कोसळले आहेत. गेल्या आठवडाभरात लाल कांदा बाजारात दाखल होताच कांदा दर दीड हजारांनी खाली आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात रोष पसरला आहे. केंद्राने कांदा विक्रीबाबत धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.

एका विशिष्ट समितीची नेमणूक करुन त्यांच्याद्वारे कांद्यासाठी अभ्यासपूर्ण धोरण आखणे गरजेचे आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात एकूण उत्पादनाच्या तुलनेत तीस टक्के कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यात उत्पादित होत असल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार प्राधान्याने झालाच पाहिजे,

याशिवाय केंद्राने लादलेली कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवून, यापुढे निर्यातबंदीचे धोरण निश्चित करतांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी आग्रही मागणी खा. गोडसे यांनी कृषीमंत्री तोमर यांच्याकडे केली आहे.

कृषी रेल्वेतून शेतमाल वाहुकीसाठी दिल्या जाणाऱ्या सबसिडीत द्राक्ष, ॲपल बोर यासह अन्य भाजीपाला वर्गीय पिकांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच कृषीरेल्वेकडून सर्वच शेतमालाला सबसिडी दिण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

यापुढे कांदा निर्यातबंदीचे धोरण निश्चित करतांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची आग्रही मागणी कृषीमंत्री तोमर यांच्याकडे केली आहे.

- खासदार हेमंत गोडसे, नाशिक