विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन बाळगावाः डॉ.शिरूडे

विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन बाळगावाः डॉ.शिरूडे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कॅम्पातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात (Maharaja Sayajirao Gaikwad College) अर्थशास्त्र विभागाचे (Department of Economics) प्रा.डॉ. बी.एम. सोनवणे (Dr. B.M. Sonawane) यांनी लिहिलेल्या ‘डेव्हलप्मेंट प्लान्स ऑफ मॉडर्न इंडिया-पॉलिसिज् अ‍ॅण्ड प्रोग्रामस’ (Development Plans of Modern India-Policies and Programs) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य समाधान हिरे, कृउबा सचिव अशोक देसले, श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साळुंखे, महिला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिना पाटील प्रमुख अतिथी म्हणून तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे उपस्थित होते. प्रकाशन सोहळा आयोजनाचा हेतू अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.व्ही. हिरे यांनी विषद केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना हिरे यांनी विद्यार्थ्यांना (students) स्वावलंबनाचा (Self reliance) मंत्र दिला. शासनस्तरावरून युवकांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कृउबा सचिव देसले यांनी विद्यार्थ्यांना बाजार समितीमार्फत विपणनाची प्रक्रिया समजून सांगितली. विद्यार्थी हा महाविद्यालय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची मुले आहेत. शेतमाल बाजारपेठेत विक्रीस आणतांना त्याची कशी काळजी घ्यावी, प्रतवारी कशी असावी, यासंदर्भात वास्तववादी माहिती अभ्यासून त्या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुटुंबास करून दिल्यास शेतकर्‍यांना निश्चितच फायदा होईल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्त्या साळुंखे यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी बचत गट व बचत गटांमार्फत चालविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. डॉ. बी.एम. सोनवणे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना, करोना काळात पुरेसा वेळ उपलब्ध झाल्यामुळे एकविसाव्या शतकातील भारतात नव्याने सुरू झालेल्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती विद्यार्थी व वाचकांना व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या (central government) विविध क्षेत्रातील प्रमुख पंधरा योजनांची व कार्यक्रमांची माहिती या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे. हे पुस्तक शासकीय योजनांची माहिती जाणून घेणार्‍यांसह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक होण्याचा सल्ला दिला. शासकीय नोकर्‍यांवर विसंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरु करून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जिद्द व क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेणेही आता काळाची गरज आहे. यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी मसगा महाविद्यालयात नेहमीच प्रयत्न केले जातात. करोनावर विजय प्राप्त केल्यानंतर आता प्रत्येकाने स्वतःतील क्षमता व कौशल्यांचा विकास करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन महाविद्यालयामार्फत दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पाटील यांनी पुस्तकाची प्रस्तावना स्पष्ट केली. कार्यक्रमास ग्रंथपाल नीलेश नागरे, पर्यवेक्षक डॉ. एन.बी. बच्छाव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल निकम आदिंसह अर्थशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल गरुड यांनी केले तर शेवटी डॉ. डी.एन. सोनवणे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.