नीटचा निर्णय झाला, ‘सीईटी' चा कधी ?

नीटचा निर्णय झाला, ‘सीईटी' चा कधी ?

नाशिक | Nashik

सर्वोच्च न्यायालयाने 'नीट' आणि 'जेईई'ची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश दिल्याने महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या इंजिनियरींग, फार्मसी, कृषी पदवीच्या 'सीईटी' तसेच इतर अभ्यासक्रमाच्या 'सीईटी' परीक्षांचा निर्णय काय हाेताे.

याबाबत विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता अाहे. जर जेईई होणार आहे, तर राज्य सरकारला सीईटी घ्यावी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून राज्याची सीईटी परीक्षा घ्यायची ठरल्यास ती कधी हाेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष्य लागले आहे.

'नीट' आणि 'जेईई मेन' या परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुधारीत वेळापत्रकानुसार नीटची परीक्षा १३ सप्टेंबर, तर जेईईची परीक्षा १ ते ६ डिसेंबर या काळात घेतली जाणार होती, पण ही परीक्षा आणखी पुढे ढकलावी, अशी याचिका विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होईल, असे स्पष्ट केले.

तर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सीईटीचा निर्णय येत्या आठवडाभरात घेतला जाईल. परीक्षेसाठी राज्य सीईटी सेलकडून सर्वेक्षण सुरू आहे, असे नुकतेच सांगितले होते. मात्र आता जेईईसह नीट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा ठरलेल्या वेळेत हाेणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाला सहा ते सात लाख विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी लागण्याची दाट शक्यता आहे.

बारावीनंतर तसेच पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. परंतु करोना प्रादुर्भावामुळे या प्रवेश परीक्षांची तारीखच निश्चित करणे राज्य सीईटी सेलला अवघड झाले आहे. परिणामी या सीईटीच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ६ लाख ९६ हजार विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलून, त्यांची तारीख भविष्यात जाहीर करण्याबाबतची माहिती सीईटी सेलने तेव्हा वेबसाइटवर प्रसिद्ध केली हाेती.

सीईटी मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या १३ प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मार्चनंतर दिवसेंदिवस करोनाच्या प्रादुर्भावात वाढ होऊ लागल्यामुळे या तारखरांमध्ये बदल करण्यात आला होता. बदलांनंतर १५ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. अद्यापही या बाबत निर्णयाची प्रतिक्षा आहे. याबद्दल निर्णय कधी हाेताे व ताे काय हाेताे याकडेच विद्यार्थ्यांचे लक्ष्य लागले अाहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com