ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थी कंटाळले
ऑनलाईन शिक्षण

ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थी कंटाळले

कसबे सुकेणे | वार्ताहर | Kasabe Sukene

गेल्या दीड वर्षापासून करोना प्रादुर्भावामुळे (Corona) राज्यभरातील अनेक शाळा बंद असून आता ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वी चे वर्ग वगळता इतर वर्गाच्या शाळा बंद आहे. परिणामी जे वर्ग बंद आहे अशा विद्यार्थ्यांसाठी (Students) ऑनलाईन शिक्षण (Online Study) प्रणाली सुरू आहे. परंतु आता या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले असून प्रत्यक्ष शिक्षण हवे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालकांकडून व्यक्त होत आहे...

करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या (Corona Third Wave) संभाव्य पार्श्वभूमीवर अद्यापही 1 ली ते 7 वी चे व 12 वी नंतरचे सर्व प्रकारचे महाविद्यालयीन वर्ग अद्यापही बंद आहे. शहरी भागात सर्व शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

मात्र ग्रामीण भागात जेमतेम 30 ते 40 टक्के ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून बाकी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना इतर घातक सवयी लागत असून प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील पालक दिवसभर रोजगाराच्या निमित्ताने घराबाहेर असतात. पर्यायाने त्यांना मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. मुले मोबाईलचा वापर ऑनलाईन शिक्षणापेक्षा गेम खेळण्यातच अधिक करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मात्र जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पालक व शिक्षकांच्या दबावापोटी घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचेही मन ऑनलाईन शिक्षणात लागत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. ऑनलाईन शिक्षण फक्त एक फॅशन आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षकांपुढे नसल्याने त्यांना अध्यापन फारसे समजत नाही. शहरातील मुले क्लासेसमुळे पुढे जात आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी पूर्णपणे मागे पडले आहे. त्यामुळे शाळा सुरु करणे काळाची गरज आहे.

-संदीप कातकाडे, पालक (ओणे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com