टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी

टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी

निफाड। प्रतिनिधी Niphad

आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) एक दिवस अगोदर जि.प. शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात व भगव्या पताका हाती घेत विठु नामाचा गजर करीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपाळांनी वारकरी वेश परिधान केला होता. चौक, मुख्य रस्ता आदी ठिकाणी रिंगण सोहळा देखील संपन्न झाला. या दिंडी सोहळ्याने अवघा परिसर विठु नामाच्या भक्तीरसात न्हावून निघाला होता.

मौजे सुकेणे विद्यालय (Mauje Sukene Vidyalaya- Kasbe Sukene)

कसबे सुकेणे। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम व विठ्ठल रुक्माई च्या जयघोषात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व पालखी सोहळ्याने श्रीक्षेत्र मौजे सुकेणे दुमदुमले होते. येथील अभिनव गटातील पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत च्या मुलींनी नऊवारी साडी व मुलांनी पारंपारिक गणवेश सहाय्याने आषाढी एकादशीच्या वारकर्‍यांना शुभेच्छा देण्यासाठी या दिंडीचे व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक शिवाजी कोटकर, पर्यवेक्षक अनिल वाघ, संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे, क्रीडाशिक्षक दिलीप काळे, अनिल उगले व सर्व सेवक वृंद यांनी या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

सुरुवातीला पालखी मधील विठ्ठल रुक्माई च्या मूर्तींचे प्राचार्य शिंदे, उपमुख्याध्यापक कोटकर व पर्यवेक्षक वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी दिंडी व पालखीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी रुपी वारकर्‍यांनी श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गावातून भव्य मिरवणूक रुपी दिंडीचे आयोजन केले. सुरुवातीला तबला धारक विद्यार्थी त्या नंतर तुळस डोक्यावर घेतलेल्या विद्यार्थिनी, भगवे ध्वजधारी विद्यार्थी, भगवा व कुर्ता गणवेशातील वारकरी विद्यार्थी, नऊवारी घातलेल्या विद्यार्थिनी व इतर पारंपारिक गणवेशातील विद्यार्थी त्यांच्या सोबत सर्व शिक्षक वृंद व दिंडी मध्ये गायले जाणारे विठ्ठल रुक्माई, ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषात या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौजे सुकेणे गावातील सुहासिनी, दिंडीतील वारकरी रुपी विद्यार्थी व विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन केले. हा दिंडी सोहळा बघण्यासाठी गावातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय (Loknete Dattaji Patil Vidyalaya- Lasalgaon)

लासलगाव। आषाढी वारीचे औचित्य साधून लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाची शाळा भरली आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ऐकायला मिळाला. हातात भगवी पताका घेतलेले वारकरी विद्यार्थी, डोई तुळशी वृंदावन आणि त्या मृदुंगाचा घुमलेला गजर असा माहोल प्रभात फेरीमध्ये पहावयास मिळाला. विठ्ठल रुक्माईच्या वेशातील चिमुकले विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पालखी सोहळा झेंडा चौक व परिसरातून येवून ग्रामपंचायतीच्या प्रांगणात रिंगण तसेच फुगडीचा फेर धरला. ग्रामस्थांनी पालखीची पूजन केले.

दिंडीमध्ये हरित सेनेच्या विद्यार्थ्यांमार्फत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. संस्कृत शिक्षक दत्ता मरकड यांनी आषाढी एकादशी व पालखीचे महत्त्व विशद केले. दिंडीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना गोड प्रसाद देवून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, संचालिका नीता पाटील, पुष्पा दरेकर, रंजना पाटील, शंतनू पाटील, वैष्णवी पाटील, प्राचार्य दत्तू गांगुर्डे, मुख्याध्यापिका संजीवनी पाटील, पर्यवेक्षक केशव तासकर, बाळकृष्ण झाल्टे यांनी केले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी चंद्रकांत नेटारे, रमेश पगार, हेमंत नाईक, विजय वाणी, रवींद्र पाटील, राजेंद्र पाडवी, श्रीहरी शिंदे, दशरथ पायमोडे, प्रकाश कोल्हे, विलास दखने, संदीप गंभीरे, शारदा केदारे, आरती गायकर, रेखा सपकाळे, पोर्णिमा लिमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

जिजामाता प्राथमिक शाळा (Jijamata Primary School )

जिजामाता प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी वारकर्‍यांची वेशभूषा करुन आले होते. विठ्ठलाची वेशभूषा विराट खाडे, रुक्मिणीची वेशभूषा तनिष्का काळे, चैताली खाडे, अनन्या सोनार, ईश्वरी कोळी यांनी साकारली होती. तसेच अमोल पाडवी याने संत तुकारामांची वेशभूषा केली होती. दिंडीच्या अग्रभागी पालखी, तुळशी वृंदावन, कलशधारी मुली, भागवत धर्माची पताका घेत मुले शिस्तबद्धपणे चालत होती. स्त्री-पुरूष समानता, शिक्षणाचे महत्व, वृक्षलागवड, पर्यावरण रक्षण, जलसंधारण, पाणी व ऊर्जाबचतीचे संदेश देणारे फलक मुलांनी हातात धरून त्याद्वारे सामाजिक जनजागृती केली. उपस्थित पालक तुकाराम खाडे, बाबासाहेब गिते, सागर काळे, कुंभार्डे व मुख्याध्यापक अनिस काझी यांनी पालखीचे पूजन केले.

टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या गजरात शाळेच्या मैदानावरुन दिंडीचे प्रस्थान झाले. ज्ञानोबा, तुकाराम, विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष बालवारकरी करत होते. सर्व्हे नं.93 येथील दुर्गा देवी मंदिर समोरील प्रांगणात रिंगण सोहळा संपन्न झाला. विठू नामाच्या व टाळाच्या गजरात बाल वारकर्‍यांनी गोल रिंगण करून मंत्रमुग्ध होत नाचण्याचा तसेच शिक्षकांनी देखील फुगडीचा आंनद लुटला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिस काझी, कैलास भामरे, सुहास बच्छाव, दिलीप शिरसाठ, समीर देवडे, राजाराम जाधव, केदूबाई गवळी, योगीराज महाले, बद्रिप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे आदींसह विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

नूतन विद्या प्रसारक मंडळ इंग्लिश मेडीयम स्कूल (Nutan Vidya Prasarak Mandal English Medium School)

नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त प्री प्रायमरी विभागातील मुलांची दिंडी शालेय आवारात काढण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्व शिक्षिका मनीषा सूर्यवंशी यांनी विषद केले. पालखीचे पूजन उपमुख्याध्यापिका मिनल होलकर, नीता जेजूरकर, तुकाराम केदारे तसेच मृणाली बकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप होळकर, संचालक हसमुख पटेल, योगेश पाटील, सचिन मालपाणी, चंद्रशेखर होळकर, मुख्याध्यापक सत्तार शेख उपस्थित होते. गणेश डोमाडे याने विठ्ठलाची तर मुद्रा होळकर हिने रुक्मीणीची भूमिका पार पाडली. तसेच पार्थ भांबरे याने एकनाथ महाराज, कबीर शेजवळ याने नामदेव महाराज, दिव्यम देशमुख याने ज्ञानेश्वर महाराज तर अनन्या देवरे हिने मुक्ताबाईची भूमिका साकारली. सर्व बाल वारकर्‍यांनी हाती भगवा झेंडा घेऊन व पारंपारिक वेशभूशेसह विठूनामाचा जयघोष करून दिंडीत सहभाग घेतला. चेतन भावसार यांनी इयता सातवीच्या विद्यार्थ्यांचे संगीतमय भावगीते आणि भजन सादर केले. दिंडीची सांगता पांडुरंगा चरणी भरघोस पाऊस पडावा म्हणून बालवारकर्‍यांनी प्रार्थना केली. सूत्रसंचालन व आभार वैशाली कासव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शनी गायकवाड, गीता काळे आदींचे सहकार्य लाभले.

अभिनव बालविकास मंदिर( Abhinav Balvikas Mandir- Mahadev Nagar)

महादेवनगर। हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठलाचा जयघोष करत पायी निघालेले वारकरी, विठ्ठल-रखुमाईच्या साजिर्‍या वेषातील बाळगोपाळ विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेले हे दृश्य शनिवारी देवगावच्या अभिनव बालविकास मंदिर या शाळेमध्ये दिसले. भक्ती व श्रद्धेची परंपरा जपत निसर्गपूजेचा संदेश देत अभिनव बाल विकास मंदिर या शाळेतील छोट्या वारकर्‍यांचा दिंडीसोहळा पार पाडत आषाढी एकादशी आनंदात साजरी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल- रुखमाई व संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने करण्यात आले. यावेळी प्राचार्य बी.व्ही. कडलक, डी.के. घोटेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येवून विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती.एस.एन. गांगुर्डे, श्रीमती.के. टी. पानगव्हाणे, श्रीमती. वंदना उराडे, श्रीमती. रेखा मोरे, दीपक मोरे आदींसह अभिनव बालविकासचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com