विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू - डॉ. कानिटकर

विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू - डॉ. कानिटकर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विद्यार्थी हा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (University of Health Sciences)केंद्रबिंदू आहे. तो लक्षात घेऊन विद्यार्थी कल्याणाच्या योजना विस्तारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Chancellor Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar) यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांची संलग्नीत महाविद्यालयातील प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी मार्गदर्शन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरू जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, विशेष कार्य अधिकारी ब्रिगेडिअर सुबोध मुळगुंद, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रति- कुलगुरु डॉ.मिलिंद निकुंभ म्हणाले, विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजना अत्यंत उल्लेखनीय आहेत. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदर योजनांची माहिती पोहचणे व त्याचा लाभ विद्यार्थ्याना होईल यासाठी सर्वानी व्यापक दृष्टिकोन ठेवावा. कमवा व शिका योजनेत विद्यार्थी शिक्षण घेत असतांना महाविद्यालयात काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते त्यातून कामाचे व आर्थिक बाबीेंचे महत्व त्यांना कळते. मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना असून मुलींनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधी अधिकारी अ‍ॅड. संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की,विद्यार्थी कल्याणकारी योजनांकरीता अर्थसंकल्पात मोठया प्रमाणात तरतूद करण्यात आली असून विद्यार्थींना माहिती अभावी योजनापासून वंचित राहतात.

या विद्यार्थ्यांना योग्य माहिती व मार्गदर्शनाची गरज आहे. विद्यार्थी कल्याणकारी योजनांबाबत विद्यापीठाकडून काटेकोर नियमावली तयार करण्यात आली. या परिसंवादात डॉ. मोरे यांनीे विद्यापीठाचे विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब पेंढारकर, राजेश इस्ते, स्मिता करवल, आबाजी शिंदे, प्रतिभा बोडके, रमेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com