नाशिक | Nashik

नाशिक शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात वाहन पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून त्याकरिता शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंग व्यवस्था करण्याचे ठरवले आहे.

दरम्यान यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांना पत्र दिले आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील जागेत भूमिगत पार्किंग प्रकल्प करण्यासाठी जागा मिळावी यासाठी साकडे घातले आहे.

नाशिक शहरात अद्ययावत असे पार्किंग असल्यास शहर सुंदरतेत भर पडणार असल्याने स्मार्ट सिटी कंपनी ने सदर जागेत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर भूमिगत दोन मजली वाहन पार्किंग चा आराखडा तयार केला असून त्याकरिता जवळपास १२१.०५ कोटी खर्च येणार आहे.

त्याबाबत स्मार्ट सिटी कंपनी ने दि. १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना २६ मार्च २०१६ रोजी पत्र देऊन सदरची जागा मिळावी यासाठी निवेदन दिले आहे.

नाशिक शहराची वाढती लोकसंख्या तसेच दिवसागणिक वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अद्यायावत असे भूमिगत दोन मजली पार्किंग उभारल्यास जवळपास ८०० चारचाकी वाहनांचा पार्किंगचा प्रश्न सुटणार असून वरील भागात दिल्लीच्या धर्तीवर अद्यावत असे स्टेडियम होऊ शकते. त्यामुळे नाशिक शहराच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होऊन नागरिकांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे.