
निफाड | वार्ताहर
विद्युत वितरण कंपनीच्या अवाजवी वीजभारनियमन व अनोगोंदी कारभाराच्याविरोधात निफाड तहसील कार्यालयावर निफाड तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने मा.आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा निघणार आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता निफाड बाजार समितीच्या पटांगनापासून मोर्चास प्रारंभ होणार असून जळगाव फाट्यामार्गे निफाड तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
निफाड तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भर म्हणून वीज वितरण कंपनीने अवाजवी वीजभारनियमन वाढवल्याने उभी पिके जळून चालली आहे. महावितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराबाबत माजी आमदार अनिल कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून उद्याच्या मोर्चात प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे.
निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य अभियंता कुमठेकर न आल्यास मोर्चावेळी रास्ता रोको करण्याचा इशाराही अनिल कदम यांनी दिला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल कदम व निफाड तालुका शिवसेना युवासेनेने केले आहे.