सिन्नर शहरात कडकडीत बंद
नाशिक

सिन्नर शहरात कडकडीत बंद

बाजारात दिवसभर शुकशुकाट

Abhay Puntambekar

सिन्नर ।प्रतिनिधी

शहरातील वाढता ‘करोना’ संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन व व्यापारी संघटनेने पुकारलेल्या बंदला आज (दि.२) च्या दुसर्‍या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण शहराने, उपनगरांनी कडकडीत बंद पाळला. सकाळी दोन-चार अपवाद वगळता जवळपास सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. शहराची मुख्य बाजारपेठ असणार्‍या गणेश पेठेतील एक कापड दुकान वगळता सर्वांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे गणेश पेठेत ग्राहकही न फिरकल्याने सायंकाळपर्यंत शुकशुकाट दिसत होता.

नवा पूल भागात १ ते २ विक्रेते आंबे विकतांना दिसत होते. एक खत दुकान व मेडीकल वगळता नेहरु चौक भागातही सर्व दुकाने, हॉटेल्स, खाणावळ, चहाच्या टपर्‍या बंद होत्या. बसस्थानक परिसरातील एक वाईन शॉप व एक किराणा दुकान वगळता सर्व दुकाने बंद होती. लाल चौक भागातही सर्व किराणा मॉल्स बंद असल्याने नेहमी गर्दीने गजबजणार्‍या या परिसरात चिटपाखरु दिसत नव्हते. नेहमी वाहनांची होणारी गर्दी या भागात दिसली नाही. मोटार सायकली, वाहने क्वचीतच दिसत होती.

सिन्नर-पूणे महामार्गावरील अपना गॅरेज परिसरात एखादे गॅरेज वगळता सर्व दुकाने बंद दिसत होती. वावी वेस परिसरातही दुकाने बंद असल्याने गर्दी दिसत नव्हती. नेहमी गर्दीने गजबजणारे शहर आज शांत-शांत दिसत होते. शहरातील डॉक्टर्स, मेडीकल्स व खत दुकाने उघडी दिसत होती. मात्र, तेथेही नेहमीसारखी गर्दी दिसत नव्हती. दुकानदारांनीच मनावर घेतल्याने ग्राहकांनीही रस्त्यावर न येता घरीच थांबणे पसंत केले. अधून-मधून मोटार सायकलींवर डबल-टीबल शिट फिरणारे तरुण दिसत होते. मोठी वाहनेही शहरात फारशी दिसली नाहीत.

आडव्या फाट्यावरील भाजी बाजारात दिवसभर शुकशुकाट होता. केवळ भाजी विक्रेत्यांचे रिकामे पाल मैदानावर उभे होते. पावसामुळे परिसरात चिखलच चिखल दिसत होता. त्यात रंगबेरंगी पाल उठून दिसत होते. या बाजाराकडे आज ना विक्रेते फिरकले ना ग्राहक. त्यामुळे दिवसभर गर्दीने फुलणारा हा भाग सुना-सुना भासत होता. शहरात कुठेही पोलीस अथवा प्रशासनाचे अस्तीत्व दिसत नव्हते. सिन्नरकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याने पोलीस व प्रशासनानेही आज शांतता अनुभवली.

Deshdoot
www.deshdoot.com