पोलीसांच्या रडारवर टवाळखोर

36 ठिकाणी नाकाबंदी, यंत्रणा सज्ज
पोलीसांच्या रडारवर टवाळखोर

नाशिक । प्रतिनिधी

सरत्या वर्षाला समोरोप व नववर्षाचे स्वागत करत असताना कोणाचाही आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही, प्रामुख्याने टवाळखोर रडारवर असून त्यांच्यावर विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. तर शहरात येणार्‍या 36 मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी शहर पोलीसांनी यंत्रणा सज्ज केली असल्याचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगितले.

आयुक्त पांडे म्हणाले, शासनाने गाईडलाईन जारी केल्या आहेत. रात्री संचारबंदीचे आदेश जारी आहेत. तसेच कोवीड 144 चे आदेश लागू आहेत. त्यानुसार रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्री संचारबंदी असणार आहे. तर शहरात 13 पोलीस ठाण्यांअंतर्गत 30 ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. नागरीकांनी घरीच साधेपणाने नववर्षाचे स्वागत साजरे करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सोसायट्यांच्या गच्च्या या ठिकाणी गर्दी तसेच मद्यपान केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हॉटेल्स व सर्व अस्थापना 11 वाजेच्या ठोक्याबरोबर बंद करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करण्यात येणार आहेत.

शहरातील 13 पोलीस ठाण्यांअंतर्गत त्या त्या भागात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गस्ती पथकांची संख्या वाढवण्यात आली असून शहरात रात्रभर गस्त सुरू राहणार आहेत.

गुरूवार, मार्गशिर्षचा प्रभाव

यंदा 31 डिसेंबर बरोबर गुरूवारी आला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बहूतांश नागरीक मांसाहार व मद्याला प्राधान्य देतात. यासाठी कित्येक टन मटन, चिकन व माशांचा फाडशा पाडला जातो. मात्र यंदा वर्षी गुरूवारी 31 डिसेंबर आल्याने अनेक लोक आठवड्यातील किमान गुरूवारी मांसाहार टाळतात. यातच हा साधा गुरूवार नसुन घरोघरी महिला महालक्ष्मीचे व्रत करत असलेल्या मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवार आहे. यामुळे मांसाहारवर गृह मंत्र्यांकडूनच चाप असणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

शहराबाहेर गेल्यास सकाळीच या परत

31 डिसेंबरसाठी अनेक नागरीक शहराबाहेर, पर्यटनस्थळे, तसेच हॉटेलमध्ये जातात. परंतु जर त्यांना माघारी येण्यास 11 नंतरचा वेळ झाला तर त्यांनी परत येऊ नये. शहरातील प्रत्येक अशा 30 ठिकाणांवर तपासणी नाके असणार आहे. अशांनी सकाळी 6 नंतरच परतावे अन्यथा त्यांच्यावर संचारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com