जि.प.सेवकांसाठी कडक निर्बंध

वाढत्या रुग्ण संख्येमुळे घेतला निर्णय
जि.प.सेवकांसाठी कडक निर्बंध

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा हॉटस्पॉट आणि वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्यालयासह पंचायत समिती स्तरावर सेवकांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. सेवकांनी घोळका करू नये,विभागात विना मास्क परवानगी नाही,असे निर्बंध घालण्यात आले आहे.

कोणत्याही विभागात करोनाच्या उपाययोजनांबाबत हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधित विभागातील सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल,असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

आठवडाभरात तब्बल 20 ते 22 सेवकांना करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले असून अनेक सेवक घरीच क्वॉरंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) आनंदराव पिंगळे यांनी करोनाबाबतचे परिपत्रक काढले आहे.

असे आहे परिपत्रक

सेवकांनी वेळेचे नियोजन करून कार्यालयात जास्त गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. टपाल एक खिडकीद्वारे ट्रे मध्ये ठेवण्याच्या सूचना द्याव्यात. बाहेरील व्यक्ती येणार नाही, याचीही काळजी घ्यावी. यासंदर्भात विभागनिहाय भेटीत हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधित विभागासह विभागातील सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांना जबाबदार धरून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

50 टक्के उपस्थितीची मागणी

जिल्हा परिषदेत कामानिमित्त मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने सेवकांसह अधिकार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत नागरिकांना बंदी घालतानाच सेवकांची उपस्थिती 50 टक्के करावी, अशी मागणी राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना क्रमांक 695 नाशिक शाखा व जिल्हा परिषद अभियंता संघटनेने उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी अध्यक्ष प्रमोद निरगुडे, नितीन मालुसरे, सचिन विंचूरकर, निवृत्ती बगड, महेंद्र पवार, प्रदीप अहिरे, ज्ञानेश्वर गायकवाड, दिनेश टोपले, नरू पाटील, रणजित पगारे, सोनाली भार्गवे, नम्रता तोटे उपस्थित होते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com