गर्दी नियंत्रणासाठी बाजार समितीत उपाययोजना

गर्दी नियंत्रणासाठी बाजार समितीत उपाययोजना

पंचवटी । वार्ताहर

वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाशिक कृषी बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून, बाजार घटकांना पास बंधनकारक केले आहेत. तसेच, सुरक्षारक्षकांच्याही संख्येत वाढ करण्यात आली आहे.

नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाभरातून फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा खरेदी-विक्रीसाठी दररोज हजारो शेतकरी येत असतात. तसेच, नाशिकसह काही मुंबईचे व्यापारीही बाजार समितीत येत असतात. हमाल-मापारी आदी वर्गाचीही मोठी गर्दी होत असते. भरेकरीदेखील बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. त्यामुळे गर्दी होत असते.

मात्र कोरोनाकाळात गर्दी वाढू नये, ही बाब लक्षात घेऊन सभापती पिंगळे यांनी तातडीने बाजार समिती प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देत कठोर पावले उचलली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करत आवारात शेतकरी, व्यापारी, मापारी व हमाल यांना 'नो मास्क नो एण्ट्री' हा नियम कडक केला. बाजार समितीच्या घटकांव्यतिरिक्त इतरांना व लहान मुले, वयोवृद्धाना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

भाजीपाला व फळभाज्या घेऊन येणारी 'एक गाडी एक शेतकरी' यावे, असे नियम करण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपकाद्वारे सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा, विनाकारण जात वेळ थांबू नका, अशा सूचना वेळोवेळी केल्या जात आहेत. बाजार समितीत येणारे व्यापारी,आडते, हमाल - मापारी यांना पास बंधनकारक केले आहेत. बाजार समितीच्या आवारात प्रवेश करताना पास दाखविल्यास प्रवेश देण्यात येत आहेत. पास नसल्यास प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. तरी बाजार घटकांनी पासेसचा वापर करीत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन समिती प्रशासनाने केले आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणखी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सचिव अरुण काळे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र तुपे व सुरक्षारक्षक यांनी उपाययोजनांसंदर्भात सभापती पिंगळे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली.

"प्रशासनास सहकार्य करा"

नाशिक मनपा आणि पंचवटी पोलिस ठाणे, बाजार समिती यांचे संयुक्त नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणेत येत आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता अनावश्यक गर्दीत बरीच घट झाली आहे. बाजार समितीकडुन आवाहन करणेत येते की, आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे तसेच शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे शासनास तसेच बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे.

- देविदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com