निफाडला ‘ब्रेक द चेन’ ची कडक अंमलबजावणी

वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाची कठोर भूमिका
निफाडला ‘ब्रेक द चेन’ ची कडक अंमलबजावणी

निफाड । प्रतिनिधी

संपूर्ण निफाड तालुका करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात करोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत असल्याने निफाड नगरपंचायतीने शुक्रवारपासून ‘ब्रेक द चेन’ची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेली निफाडची बाजारपेठ आता सुनसान झाली आहे.

निफाड तालुक्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागातील प्रशासनाकडून याबाबत उदासीनता दाखवली जात असून वाईटपणा कोणी घ्यायचा यावर घोडे अडले आहे. निफाड शहरात मात्र सत्ताधारी अन् विरोधी दोन्ही गट एकत्र आले. प्रशासकीय अधिकार्‍यांची साथ मिळाली अन् शुक्रवारपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात झाली.

दवाखाने, मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. त्यामुळे आज निफाड शहरात शुकशुकाट दिसून आला. तसेच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असून निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतीनगर चौफुलीवर मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. निफाड उपबाजारात शेतमालाचे लिलाव सोशल डिस्टन्स पाळत करण्यात येत असून बाजारपेठ बंदमुळे शेतमाल विक्रीला येणार्‍या वाहनांची संख्या घटली आहे.

निफाडप्रमाणेच लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, सायखेडा येथेही करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. तर ग्रामीण भागातील कसबे सुकेणे, उगाव, पालखेड, देवगाव, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडलेझुंगे, नैताळे, विंचूर, भेंडाळी, चांदोरी येथेही कडकडीत बंद पाळण्यात येऊन गावात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कोठुरे येथे गोदावरी दक्षिण वाहिनी असल्याने येथे रक्षा विसर्जनासाठी बाहेरून नागरिक येत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने आता रक्षा विसर्जन करणार्‍यांनी आपला मोर्चा नांदूरमध्यमेश्वरकडे वळवला आहे. साहजिक येथे रक्षा विसर्जनासाठी गर्दी होऊ लागली असून त्यामुळे करोना संसर्गाला आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे.

सध्या गोदाकाठ भागात नांदूरमध्यमेश्वर हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने येथे कठोर निर्बंध जारी करणे गरजेचे आहे. पिंपळगाव व लासलगाव ही व्यापारी बाजारपेठ असतानाही प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ची कडक अंमलबजावणी करत करोनावर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. नागरिकांनी स्वत:बरोबरच कुटुंबाची काळजी घेतली अन् गर्दीवर नियंत्रण आणले तर करोनाला हद्दपार करणे अवघड नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com