बेशिस्त चालकांंवर कठोर कारवाई व्हावी : सरंगल

अपघातांच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक:आयमात रस्ते वाहतूक सुरक्षा चर्चासत्र
बेशिस्त चालकांंवर कठोर कारवाई व्हावी : सरंगल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रस्ते अपघात ( Road Accidents ) होण्यात मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहन चालवणे कारणीभूत आहे. त्यासोबतच काही ठिकाणी अभियांत्रिकी दोष आहेत.ते शोधून दूर करता येतील. मात्र बेशिस्त वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई (Punitive action )करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल (Additional Director General of Police Kulwant Kumar Sarangal )यांनी आयमाच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात केले.

रस्ते अपघात कमी व्हावेत तसेच त्यात मृत्युमुखी पडणार्‍या लोकांची संख्या शून्यावर यावी आणि वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी आयमाच्या पुढाकाराने मंगळवारी(दि.17) जनजागृती मोहीम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात व्यासपिठावर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी बी.एस.साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासूदेव भगत, नाशिक फर्स्टचे श्रीकांत कोरडे, आयमाचे सरचिटणीस ललित बूब, माजी अध्यक्ष वरुण तलवार, बीओटी चेअरमन धनंजय बेळे,आयमाच्या रस्ते वाहतूक सुरक्षा नियोजनाचे अध्यक्ष गौरव धारकर आणि रिसिलियंट इंडियाचे राजीव चौबे उपस्थित होते.

या चर्चासत्रात मान्यवरांनी रस्ता सुरक्षिततेबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. त्यात प्रामुख्याने मुलांना लहान वयातच प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासोबतच प्रत्येक वाहन चालकाला शिक्षण देणे, त्यासोबतच ठिकठिकाणच्या अपघात प्रणव भागांची माहिती गोळा करुन या ठिकाणच्या त्रूटी दुरूस्त करणे, यानंतर बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्याच्या सूचना दिल्या.

काही ठिकाणी ट्रक चालकांना स्थानिक भाषांचे ज्ञान नसल्याने अनेकवेळा अपघाताला कारण ठरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचा सूर देखिल उमटला.अनेक वेळा अपघातानंतर स्थानिक लोक गतिरोधक उभारणीचा आग्रह धरत असतात. महामार्गावर गतिरोधकांना मनाई आहे. अशा अपघातांच्या जागा शोधून त्यावर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केल्यास अपघातांचे प्रमाण व अपघातात मरणार्‍यांची संख्या घटणे शक्य होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी राज्यात अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण नाशिकमध्ये जास्त असल्याने सांगून, त्यात जादा वेगाने चालणार्‍या वाहन अपघाताची संख्या 72 टक्के आहे. प्रत्यक्षात मिळालेल्या आकडेवारीनुसार प्रतिदिन 5 अपघाती मृत्यू होत आहेत. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी उद्योग सतत प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला उपसमिती अध्यक्ष गौरव धारकर यांनी जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारी व कारणांची माहिती देणारी चित्रफित सादर केली. आभार सरचिटणिस ललित बूब यांनी मानले. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय स्तरावरुन याबाबत प्रबोधनाची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा व सायबर स्पेस युज अ‍ॅण्ड सेफ्टी हे विषय ठेवणे काळाची गरज झालेली आहे.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील

रस्ते अपघात शुन्यावर आणण्यासाठी तीन ङ्गईफवर अमल करणे गरजेचे आहे. त्यात इंजिनिअरिंग,एनफोर्समेंट व एज्युकेशन यावर काम होणे गरजेचे आहे.

बी.एस.साळुंखे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी

अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वप्रथम कायद्यांची कडक अमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी शाळा महाविद्यालयात रोड सेफ्टी क्लब स्थापन करण्यात येत असून,त्यामाध्यमातून मुलांना सुरक्षिततेचे धडे देण्याचा प्रयत्न राहणारआहे.

वासुदेव भगत,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

उद्योजकांनी आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन याबाबत जागरुक करावे.यातून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकाली निघेल.

श्रीकांत कोरडे,नाशिक फर्स्ट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com