चार दिवसांंपासून पथदीप बंद

वीजबिल भरण्यावरून जिल्हा परिषद-ग्रामपंचायतींमध्ये कलगीतुरा
चार दिवसांंपासून पथदीप बंद
USER

लोहणेर । पंडित पाठक Lohner / Thengoda

गावांतील पथदीपांचे वीजबिल भरायचे कुणी? असा कलगीतुरा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यात रंगला असल्याने या वादाचा फटका ग्रामस्थांना बसून संपुर्ण गाव पथदीप बंद असल्याने अंधारात बुडाले आहे. ठेंगोडा वीज उपकेंद्रांतर्गत येणार्‍या 9 गावांमधील पथदीप चार दिवसापासून बंद असल्याने गावांत सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीजेचे 2 कोटीपेक्षा अधिक रूपयांचे बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित केला असल्याचे वीज वितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य वीज वितरण कंपनीच्या ठेंगोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत ठेंगोडा, खालप, सावकी, पिळकोस, खामखेडा, सरस्वतीवाडी, फुलेमाळवाडी, माळवाडी, लोहणेर आदी नऊ गावाचा समावेश आहे. या गावातील पथदीपांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडीत करण्यात आला आहे.

गावात चार दिवसापासून अंधाराचे साम्राज्य पसरले असतांना या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता थकबाकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. कोट्यवधी रुपयांची वीज बिल थकल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. गावातील स्ट्रीट लाईटचे बिल कोणी भरावे म्हणून गेल्या तीन वर्षांपासून वाद निर्माण झाला असून यापूर्वी सदरचे बिल हे जिल्हा परिषदेच्या वतीने परस्पर भरण्यात येत होते. त्यापोटी संबंधित ग्रामपंचायतीकडून वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यास नकार दिल्याने थकबाकी वाढत गेल्याने ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोझा पडला आहे.

लाखो रुपये थकबाकी असलेले वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे. राज्य वीज वितरण कंपनीच्या लोहोणेर उपविभागीय कार्यालयांतर्गत येणार्‍या ठेंगोडा सबटेशन अंतर्गत एकूण नऊ गावे असून या गावांतील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन खंडित करण्यात आल्याने सदरच्या गावांतील बत्ती गुल झाल्याने सर्वच गावे पूर्णपणे अंधारात आहेत.

ग्रामपंचायतीकडे वीज बिलापोटी लाखो रुपयांची थकबाकी असल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे. ठेंगोडा उपविभागात येणार्‍या ग्रामपंचायतीकडे 2 कोटी 23 लाख रुपयांपेक्षा अधिक बाकी आहे.

गाव निहाय ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिलापोटी असलेली रक्कम पुढील प्रमाणे खालप 16,36077, सावकी 11,28,349, पिळकोस 11,87,530, खामखेडा 12,58,774, सरस्वतीवाडी 12,36,495, ठेंगोडा 62,27,023, फुलेमाळवाडी 24,960, माळवाडी 38,06,317, लोहोणेर 34,41,946 अशी एकूण 2 कोटी 23 लाख, 23 हजार 463 रुपयांची थकबाकी सदर ग्रामपंचायतीकडे पथदीपांचे वीजबिल घेणे असल्याचे वीज वितरण कंपनीचे म्हणणे आहे.

लोहोणेर ग्रामपंचायतीचा विचार करता जिल्हा परिषदेने याआधी पुढील प्रमाणे सदर बिल भरणा केला आहे. याची नोंद ग्रामपंचायतीकडे नुकत्याच आलेल्या वीज बिलावर नोंद करण्यात आली आहे. मग आतापर्यत जिल्हा परिषद जर स्ट्रीट लाईटच्या बिलाचा भरणा करीत आली तर मग आता कुठे माशी शिकली? असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात लोहोणेर गावात गेल्या 41 वर्षापूर्वी वीज कंपनीचे दिवे पेटले. त्या आधी गावांत सर्वत्र अंधार होता. वर्षापूर्वी गावात उभे करण्यात आलेल्या पोलची संख्या आज वाढती असली तरी वीज वाहिन्या असलेल्या विद्युत तारा मात्र त्याच आहेत.

वर्षाच्या काळात त्या जीर्ण झाल्या असल्या तरी वीज वितरण कंपनीने या तारा अथवा जुने झालेले पोल बदलण्याची उदारता वा मानसिकता कधी दाखवलेली नाही. या तारा अजूनही काही ठिकाणी लोंबकळत आहेत. घरगुती वीज कनेक्शनचे बिल थकले तर वीज वितरण कंपनी सदर कनेक्शन त्वरित खंडित करते. मात्र एकीकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी सहन कशी करते? असा प्रश्न ग्रामस्थांतर्फे उपस्थित केला जात आहे.

यापुर्वी कधीही स्ट्रीट लाईट वीजबिल भरणा करण्याचा विषय ऐरणीवर आला नाही मग आताच हा विषय समोर का यावा हा एक संशोधनाचा विषय आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या रक्कमेतुन वीज बिल भरणा करण्यात यावा असे आदेश ग्रामपंचायतीना दिला असला तरी वीज बिलात समाविष्ट असलेला अधिभार व दंडाची रक्कम वजा करून निव्वळ रक्कमेचे बिल कंपनीने ग्रामपंचायतीस दिल्यास हफ्त्याने सदर वीज बिल भरणा करण्याची तयारी ग्रामपंचायतींतर्फे असल्याचे समजते.

ठेंगोडा उप विभागात येणार्‍या नऊ ग्रामपंचायतींकडे स्ट्रीट लाईट बिलपोटी 2 कोटी 23 लाख, 23 हजार रुपयांची थकबाकी आहे. वसुली पोटी वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर ग्रामपंचायतीने थकीत रक्कमेचा भरणा करून वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे.

एम.एस. चव्हाण,सहाय्यक अभियंता

वीज वितरण कंपनीने थकीत रक्कमेची बिले दिली असून त्यात दंड व अधिभार लागू करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीने जर दंड व अधिभार व इतर रक्कम वजा करून निव्वळ रक्कमेची बिले दिली तर सदर बिल हफ्त्याने अदा करणे सोयीस्कर होईल.

यु.बी. खैरनार ग्रामविकास अधिकारी, लोहणेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com