नाशिककर घेताहेत भटकी कुत्री दत्तक !

वर्षभरात दीडशेपेक्षा जास्त कुत्र्यांना मिळाली प्रेमाची उब!
नाशिककर घेताहेत भटकी कुत्री दत्तक !

नाशिक | Nashik

भटक्या कुत्र्यांची पिल्ले दत्तक (stray dog adoption) घेऊन त्यांना प्रेमाची उब आणि हक्काचा निवारा देण्यात नाशिककरांनी (Nashikkar) पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात नाशिककरांनी दीडशेपेक्षा जास्त भटकी कुत्री दत्तक घेतली आहेत.

हा सिलसिला आजही सुरूच आहे. पॉ केअर, अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन (Animal welfare Association) (paw care) अशा काही संस्था या क्षेत्रात स्वेच्छेने काम करत आहेत. या संस्थांशी नाशिकमधील ४००-५०० कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जोडले गेले आहेत. या संस्था जखमी भटक्या कुत्र्यांवर उपचार करतात.

आठवड्यातून एकदा रविवारी शहराच्या विविध परिसरात त्यांना खायला घालतात. पण भटक्या कुत्र्यांना त्यांच्या पद्धतीने जगता यायला हवे, त्यांना आयते खायची सवय लागू नये याचेही भान ठेवावे लागते असेही मत नोंदवतात. पिल्ले दत्तक घ्यावीत यासाठी समाजमाध्यमांमध्ये मोहीम (Social Media Campaign) चालवतात.

लॉकडाऊनमुळे प्रेरणा मिळाली!

आम्ही पण एक पिल्लू दत्तक घेतले आहे. त्याचे खूप लाड होतात. तेव्हा भटक्या कुत्र्यांना प्रेम मिळत नाही. त्यांची काळजी कोणीच घेत नाही याची जाणीव झाली. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात सगळे व्यवहार बंदच होते. आमच्या घराच्या आजूबाजूला काही भटकी कुत्री होती. त्यांचे खायचे हाल होत आहेत हे लक्षात आले.

तेव्हा मी आणि माझ्या भावाने त्यांना खायला द्यायला सुरुवात केली. आम्ही बिर्याणी बनवायचो आणि परिसरात फिरून ४०-५० कुत्र्यांना खायला घालायचो. ते बघून लोक चौकशी करत गेले आणि कार्यकर्ते जोडत गेले. भटक्या कुत्र्यांना लोक मारतात. अन्य कारणांनीही ते जखमी होतात.

त्यांच्यावर उपचार करतो. त्यांच्या पिल्लांची संख्याही वाढत जाते. यावर उपाय म्हणून आम्ही ती पिल्ले लोकांनी दत्तक घ्यावी असे प्रयत्न करतो. ही कुत्री देखील चांगलीच असतात हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हळूहळू कुत्री आणि भटक्या मांजरी देखील दत्तक घेण्याचे प्रमाण वाढते आहे.

-मुग्धा ठाकूर, संस्थापक-पॉ केअर.

एका दुःखद प्रसंगाने आमचे काम सुरु झाले!

एकदा आम्ही एका रस्ताने चाललो होतो. संध्याकाळची उशिराची वेळ होती. आमच्यासमोर वेगाने जाणाऱ्या वाहनाने एका कुत्र्याला उडवले आणि ती गाडी तितक्याच वेगाने निघून गेली. आम्ही धावलो. त्या कुत्र्याला बाजूला घेतले. खूप प्रयत्न केला पण त्याला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. त्याने आमच्यासमोरच जीव सोडला.

त्या प्रसंगाने खूप अस्वस्थ झालो. त्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही भटक्या कुत्र्यांसाठी काम सुरु केले. त्याला आता ३ वर्षे झाली. काही मित्र एकत्र आले. सुरुवातीला भटक्या कुत्र्यांना खायला घालायला सुरुवात केली. त्याचा उद्देश लोकांना समजावून सांगायला सुरुवात केली.

मग अडचणीत सापडलेल्यांना रेस्क्यू करणे, जखमींवर उपचार करणे असे काम वाढत गेले. उपचारांसाठी एक खासगी डॉक्टर आम्हाला मदत करतात. सरकारी पशु वैद्यकीय दवाखान्याची देखील खूपच मदत होते. भटक्या कुत्र्यांची पिल्ले दत्तक घ्यावीत म्हणून प्रयत्न करतो. लोक त्याला चांगला प्रतिसाद द्यायला लागले आहेत. एका महिन्यात ७-८ तरी पिल्ले लोक दत्तक घेत आहेत. संस्थेशी जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत आहे.

- विनोद यादव आणि इशिता शर्मा, संस्थापक- अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन.

पिल्ले कशी शोधतात?

असंख्य कार्यकर्ते जोडले गेले आहेत. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. असे कार्यकर्ते आपापल्या परिसरात लक्ष ठेवतात. त्यांना पिल्लू दिसले की संस्थेला कळवतात. संस्थेचे कार्यकर्ते त्यांची छायाचित्रे काढून सोशल मीडियावरील संस्थेच्या पेजवर टाकतात.

भटकी कुत्री सहसा त्यांचा परिसर सोडून कुठे जात नाहीत. त्यामुळे त्यांना ट्रॅक करणे सोपे जाते. जोपर्यंत ती पिल्ले दत्तक जात नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत असतात असे विनोद यादव यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com