गोष्ट क्रिकेटपटू जयस्वालची...आव्हानांवर मात करण्यात ‘यशस्वी’

गोष्ट क्रिकेटपटू जयस्वालची...आव्हानांवर मात करण्यात ‘यशस्वी’

नाशिक । प्रतिनिधी

क्रिकेट माझे पॅशन आहे. त्यासाठी मी वाटेल ते कष्ट उपसायला तयार आहे. त्याचे मला काहीच वाटत नाही. आव्हाने प्रत्येकासमोर असतात. पण ‘आपलीही वेळ येणारच आहे’ यावर विश्वास ठेवला तर तुमची पण वेळ येते...

या भावना आहेत क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालच्या राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएल खेळणार्‍या जयस्वालची गोष्टच विलक्षण आहे. क्रिकेट खेळता यावे म्हणून त्याने दूध डेअरीत पडेल ते काम केले. पाणीपुरी विकली.

पण क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न सोडले नाही की अडचणींचा पाढा कधी घरच्यांपुढे वाचला नाही. 2020 साली त्याला आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघाने अडीच कोटींना विकत घेतले. त्यावेळी त्याची मूळ किंमत लावली गेली होती फक्त 20 लाख.

तो मूळचा उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील सुरियावा गावाचा रहिवासी. क्रिकेट खेळण्याचे स्वप्न त्याला मुंबईकडे खेचून घेऊन आले. त्याचे मुंबईत कोणीच नव्हते. तेव्हा घरच्यांनी त्याची राहायची तात्पुरती सोय एका दूध डेअरीमध्ये केली होती. यशस्वी तिथे पडेल ते काम करायचा.

स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचा आणि क्रिकेटही खेळायचा. पण एक दिवस अचानक डेअरीवाल्यांनी त्याला तिथे ठेऊन घ्यायला नकार दिला. डेअरी सुटली. तो आझाद मैदानावर गेला.

तेथील त्याच्या परिचयाच्या एका सरांनी सुचवले म्हणून एका सामन्यात परफॉर्म केले आणि बक्षीस म्हणून एक तंबू जिंकला. ज्या तंबूत तो नंतर काहीकाळ राहिला. त्याने बॉल बॉय म्हणून काम केले.

खर्चाची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरी विकली. परिस्थितीची तक्रार न करता तो फक्त मेहनत करत राहिला आणि खेळत राहिला. त्याची फळे त्याला आज मिळत आहेत. 2020 साली त्याची राजस्थान रॉयल्स संघाने निवड केली. 2021 साली त्याला कायम राखले.

काहीही झाले आणि किती संकटे आली तरी क्रिकेट खेळणे सोडायचे नाही असा त्याचा पक्का निश्चय आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com