पावसाची उघडीप; मनपाकडून डांबरीकरण

मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष द्या: आयुक्तांचे आदेश
पावसाची उघडीप; मनपाकडून डांबरीकरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाने उघडीप ( Stopage of Rain ) दिल्याने डांबर आणि खडीकरणाद्वारे शहरातील खड्डे बुजवण्याचे ( Road Pits filling work ) आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे आणि गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर, विसर्जन मार्गावर विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केली आहे.

मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सहाही विभागात युध्दपातळीवर डांबर आणि खडी वापरून खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरु आहे. कामाच्या दर्जावर अभियंत्याचं लक्ष आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभाग सतर्क झाला असून पावसाने उघडीप दिल्याने युद्धपातळीवर काम सुरू आहे.

नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक 23 मध्ये कॅनलरोडसह अशोका हॉस्पिटल समोरील रस्त्यावरील खड्डे डांबर मिश्रित मटेरियल वापरून दुरुस्त करण्यात आले, तर वडाळा गावात एनएमसी हॉस्पिटलजवळ प्रभाग क्रमांक 30 मध्ये आणि वडाळा-पाथर्डी रोडवर खड्डे बुजवण्यात आले. कलानगर चौक येथील आणि राजीवनगर मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांची डांबर मिश्रित मटेरियलने दुरुस्ती करण्यात आली आहे.

नाशिक पश्चिम विभाग प्रभाग क्रमांक 13 मधील रविवार कारंजा ते होळकर पुलापर्यंतचे श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि पॅच खोदून डांबराने भरण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याच विभागात प्रभाग क्रमांक 7 मधील जुना गंगापूर नाका ते चोपडा लॉन्स पुलापर्यंतचे खड्डे आणि पॅच खोदून डांबराने भरणेचे काम सुरु आहे. पश्चिम विभागातील गाडगे महाराज धर्मशाळा ते अमरधामपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम प्रगतीत आहे. लाटे नगर परिसरातील रस्त्यावरील खड्डे बीबीएमने म्हणजेच खडी आणि डांबर मटेरीअलने भरले जात आहेत. पंचवटी भागात हिरावाडी रोड, कमल नगर भागात बीबीएमने खड्डे बुजवण्यात आले आहेत.

सातपूर प्रभाग क्रमांक 8 गंगापूर रोड आणि गंगापूर धबधबा येथील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मुख्य रस्ते आणि चौकामधील खड्डे बुजवण्यात आले आहेत. पेठरोड भागातही खड्डे बुजवण्यात आले. सातपूर प्रभाग क्रमांक 26 खुटवडनगरमध्ये मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. नवीन नाशिक विभागात अंबड एमआयडीसीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये खड्डे बुजवण्यात आलेत.

तसेच बांधकाम विभागाकडून इतरही कामे सुरु आहेत. त्यामध्ये उपनगरमध्ये रमाई आंबेडकर हॉलमध्ये दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com